कृष्णा, वारणेच्या महापुराचा विळखा सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:22 AM2021-07-25T04:22:59+5:302021-07-25T04:22:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात कृष्णा व वारणा नदीच्या महापुराने गेल्या तीन दिवसांपासून घातलेला विळखा आता सैल होत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात कृष्णा व वारणा नदीच्या महापुराने गेल्या तीन दिवसांपासून घातलेला विळखा आता सैल होत आहे. जिल्ह्यात सर्वत्र शनिवारी पावसाने उघडीप दिली असून, धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोरही कमी झाला आहे. त्यामुळे दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत शनिवारी रात्रीपासून घट सुरू झाली आहे.
शुक्रवारी मध्यरात्री पावसाचा जोर कमी झाला. त्यानंतर, शनिवारी दिवसभर उघडीप मिळाली. सहा दिवसांनी सूर्यदर्शन झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत चोवीस तासांत दहा फुटांची वाढ होऊन पुन्हा त्यात घट सुरू झाली. सांगली शहरात आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी रात्री ५२ फुटांवर जाऊन स्थिर झाली. बहे व ताकारीतील पाणीपातळीत दुपारी ३ नंतर सायंकाळी सात वाजेपर्यंत १ फुटाने घट झाली होती. मात्र, भिलवडी व सांगलीतील पाणीपातळी रात्री उशिरापर्यंत स्थिर होती. पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या मते रविवारी सकाळपर्यंत सांगलीतील पाणीपातळीत घट होण्याची शक्यता आहे.
शनिवारी पावसाने उघडीप दिली असली, तरी शुक्रवारी झालेल्या पावसाचा व धरणांमधील विसर्गाचा परिणाम शनिवारी दिसून आला. शनिवारी कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणीपातळीत दिवसभर वाढ होत गेली. सायंकाळी पाचनंतर काही ठिकाणी कृष्णा व वारणा नदीच्या पाणीपातळीत घट होण्यास सुरुवात झाली. सांगली, अंकली व मिरजेपर्यंतच्या पाणीपातळीत रात्री उशिरापर्यंत घट झाली नव्हती. रविवारी सकाळपर्यंत काही फुटांनी पाणी उतरण्याची चिन्हे आहेत.
चाैकट
सांगलीचा कोल्हापूर, इस्लामपूरशी संपर्क तुटला
आयर्विन व बायपास या दोन्ही पुलांच्या उतारास पुराचे पाणी वाढल्याने सांगलीचा इस्लामपूरशी संपर्क तुटला. कोल्हापूर रस्त्यावर पाणी आल्यानंतर, तसेच अंकली येथील नाक्याजवळ पाणी आल्याने कोल्हापूरशी असलेला संपर्कही तुटला.
चौकट
जिल्ह्यातील ५७ मार्गांवरील वाहतूक बंद
जिल्ह्यात मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव या तालुक्यात नदीकाठी ठिकठिकाणच्या ५७ रस्त्यांवर पाणी आल्याने, त्या ठिकाणची वाहतूक बंद झाली. नदीकाठच्या गावांचा अन्य गावांशी असलेला संपर्कही तुटला. जिल्ह्यातील बऱ्याचशा मार्गावर पाणी असल्यामुळे एसटीसेवा बंद झाली.
चौकट
जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊस मिमी (शनिवारी सकाळपर्यंत)
मिरज ५७.५
जत १.८
खानापूर-विटा ३२.९
वाळवा-इस्लामपूर १४०.९
तासगाव २७
आटपाडी ४.८
क. महांकाळ १४.२
पलूस ५९.१
कडेगाव ५२.८
(शिराळ्याचा पाऊस नोंदला नाही)
चौकट
धरणातील विसर्ग घटला
वारणा व कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर घटल्याने धरणातून विसर्ग घटला. शनिवारी रात्री कोयनेतून ३० हजार २४० तर वारणा धरणातून १६ हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वारणा व कृष्णा नदीच्या पाणीपातळीत घट होत आहे. वारणा धरणाची क्षमता ३४.४० टीएमसी असून, सध्या येथील पाणीसाठा ३१.९९ इतका आहे. कोयनेतील पाणीसाठा ८७ टीएमसी झाला आहे.
चौकट
अलमट्टीमुळे दिलासा
कर्नाटकातील अलमट्टी धरणातून शनिवारी साडेतीन लाख क्युसेकने विसर्ग सुरू राहिल्याने, कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊ शकली नाही. अत्यंत मंदगतीने पाणी वाढत गेले. अलमट्टीतील विसर्ग अद्याप मोठा असल्याने येथील पाणी उतरण्यास मदत मिळणार आहे.