कृष्णा-कोयना नदीकाठालाही कर्जाचा फास!

By admin | Published: April 12, 2017 12:28 AM2017-04-12T00:28:13+5:302017-04-12T00:28:13+5:30

आत्महत्येचे लोण : बागायत शेती; पण शेतकरी कर्जबाजारी, उद्योजकही नैराश्येच्या गर्तेत

Krishna-Koyana river bank even a debt trap! | कृष्णा-कोयना नदीकाठालाही कर्जाचा फास!

कृष्णा-कोयना नदीकाठालाही कर्जाचा फास!

Next



कऱ्हाड : शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही वर्षांपर्यंत विदर्भ, मराठवाड्यात होत होत्या. त्याची कारणमीमांसा करीत उपाय शोधण्याचे काम सरकार करीत आहे. सध्या राज्यातील विरोधी पक्षांनी तर शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्षयात्रा सुरू केलीय. मात्र, गतवेळी दिलेली कर्जमाफी, सरकारच्या तिजोरीवर पडलेला भार, त्यातून नेमके काय साध्य झाले, ज्यांच्यासाठी कर्जमाफी दिली त्यांना तरीही आत्महत्या का करावी लागतेय, हा प्रश्न सुटत नाही; पण आता हे लोण चक्क सधन समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात पोहोचले आहे.
गत महिन्यात तर कऱ्हाड तालुक्यात चार आत्महत्यांनी जनजीवन अस्वस्थ झाले आहे. आत्महत्येची कारणे वेगवेगळी असली तरी ते नेमके का घडत आहे. याचा शोध आणि बोध घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होताना दिसते.
शेती परवडेना, नोकरी मिळेना आणि व्यावसायिक स्पर्धेत टिकाव लागेना, अशीच काहीशी अवस्था आता मराठी माणसाची झालेली दिसते. म्हणून तर वडगावमधील सख्ख्या चव्हाण भावांची आत्महत्या असो, कऱ्हाडातील उद्योजक कुलकर्णींची आत्महत्या असो किंवा मसूरमधील शेतकरी बर्गे यांची आत्महत्या असो. या चार आत्महत्यांमुळे सधन समजल्या जाणाऱ्या कऱ्हाड तालुक्यावर चिंतनाची वेळ येऊन ठेपली आहे.
कृष्णा-कोयना नद्यांच्या काठावर बराचसा कऱ्हाड तालुका वसला आहे. महाराष्ट्राला वरदायी ठरणारे कोयना धरण जणू उशाला आहे. उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आलीय.
तालुक्यातील साखर कारखान्यांच्या धुराड्यातून धूर बाहेर पडू लागल्याने ‘शुगर बेल्ट’ म्हणून या परिसराची ओळख निर्माण झाली. उसाच्या उत्पन्नामुळे शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे खिळखिळू लागले आहेत. अशा परिस्थितीतही इथला शेतकरी आत्महत्येला का प्रवृत्त होत असेल, हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे.
खरच शेतकरी अडचणीत का येतोय? याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर अनेक उत्तरे समोर येतील. त्यापैकीच एक म्हणजे मूळच्या शेतजमिनींचे होणारे तुकडे. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या वाट्याला एकर ते दीड एकर जमीन आहे. भविष्याचा विचार केला तर त्यांच्या मुलांच्या वाटणीला ही जमीन गुंठ्यावर येणार असून, त्यातून मिळणारे उत्पन्नही अत्यल्प असणारे आहे. अल्प शेती असल्याने शेतीपूरक व्यवसायाचा निर्णय घेतला तर त्यामध्येही कितपत यश येईल, हे सांगता येत नाही. वडगावच्या चव्हाण बंधूंबाबतही असेच झाले असावे.
शेतीपूरक व्यवसाय म्हणून एका भावाने कृषी औषधांचे दुकान चालविले तर दुसऱ्याने कडेगावच्या एमआयडीसीत पेंड तयार करण्याचा कारखाना काढला. त्यासाठी बँकांचे कर्ज घेतले. पण व्यावसायिक स्पर्धेमुळे व्यवसायातील चढ-उतारामुळे बँकेचा हप्ता वेळेवर जाईना, वसुलीसाठी लागलेला तगादा सहन होईना, स्वाभिमानी मराठी मनाला हे काही पटेना आणि म्हणून त्यांनी मृत्यूला कवटाळले. पण त्यांच्या या कृतीने कुटुंबासमोरचे प्रश्न संपले की वाढले, ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे.
या धक्क्यातून कऱ्हाडकर सावरताहेत तोच कऱ्हाडचे उद्योजक श्रीकांत कुलकर्णी यांनीही आत्महत्येचा मार्ग पत्करला.
आपल्या उद्योग व्यवसायातून कऱ्हाड शहर व परिसरात वेगळी ओळख निर्माण केली असतानाच त्यांनी आपली जीवनयात्रा का संपवली? हे कऱ्हाडकरांना कळेना.
खरंतर व्यावसायिक स्पर्धा जीवघेणी असते; पण ती जीव कशी घेते याचे उदाहरण म्हणून कुलकर्णींच्या आत्महत्तेच्या घटनेकडे पाहावे लागेल. मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या एका चिठ्ठीमध्ये ‘माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही,’ असेही त्यांनी लिहून ठेवले आहे. तरीही या घटनेला कोणीतरी काहीतरी जबाबदार आहेच ना !
तोवर मसूरच्या दामोदर बर्गे या अल्पभूधारक शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनेही पुन्हा एकदा शेतीसमोरचे प्रश्न चर्चेत आले आहेत. आता या केवळ चर्चाच राहणार की यावर कोणी ठोस उपाय शोधणार, हे पाहावे लागेल. (प्रतिनिधी)
म्हणे मरण यातना वाईट असतात...
मरण यातना खूप वाईट असतात, असे म्हणतात. त्यामुळे मृत्यू कोणालाही आपलासा वाटत नसावा; पण तरीही माणूस मृत्यूला असे जवळ का करीत असावा! विषारी औषध घेतल्यावर शरीराची होणारी तडफड, गळफास लावून घेतल्यावर शरीराची होणारी धडपड आणि रेल्वेखाली उडी घेतल्यावर क्षणार्धात छिन्नविच्छीन्न होणारे शरीर किती भयानक यातना सोसत असावे; पण तरीही हा मार्ग लोक पत्करतायेत. खरच यापेक्षा वाईट यातना प्रत्यक्ष जीवनात निर्माण होऊ लागल्यात.
कऱ्हाडच्या व्यापाऱ्याचा कोल्हापुरात आत्महत्येचा प्रयत्न
तीन वर्षांपूर्वी कऱ्हाडात एक व्यापारी असाच तेजी-मंदीच्या काळात अडचणीत आला. त्याला आपला व्यवसाय गुंडाळावा लागला. तरीही देणेकरांचा ससेमिरा काही संपेना. त्यांनी गावही सोडले. पण सद्य:स्थितीत कोल्हापुरात नातेवाइकांकडे राहणाऱ्या त्या व्यापाऱ्याची पाठ देणेकऱ्यांनी सोडली नाही. यातून कायमची सुटका मिळविण्यासाठी त्याने विषारी औषध घेऊन जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला खरा; पण सुदैवाने ते बचावले आहेत.

Web Title: Krishna-Koyana river bank even a debt trap!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.