सांगलीत कृष्णा नदी इशारा पातळीला स्थिर, २,१६६ कुटुंबांचे पुन्हा स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 04:28 PM2024-08-02T16:28:29+5:302024-08-02T16:29:00+5:30
जिल्ह्यातील २४ पूल, १२ बंधारे पाण्याखाली
सांगली : वारणा (चांदोली) आणि कोयना धरण क्षेत्रात अतिवृष्टी तर जिल्ह्यात गुरुवारी पावसाची संततधार सुरूच राहिली. कृष्णा नदीने गुरुवारी पुन्हा इशारा पातळी पार करून रात्री ८ वाजता सांगलीतील आयर्विन पुलाची पाणीपातळी ४०.६ फुटाला स्थिर राहिली. सांगलीतील दोन हजार १६६ नागरिकांचे पुन्हा एकदा स्थलांतर करावे लागले. जिल्ह्यातील २४ पूल आणि १२ बंधारे पाण्याखाली कायम आहेत.
वारणा धरण क्षेत्रात ८५ मिलिमीटर पाऊस झाला असून, धरणात पाणीसाठा २९.६७ टीएमसी आहे. धरणातून ११ हजार ५८५ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कोयना धरण क्षेत्रात गुरुवारी ७४ मिलिमीटर पाऊस झाला असून, धरणात ८६.२० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातून ४२ हजार १०० क्युसेकने विसर्ग सुरू होता. धरणात पावसाचा जोर असल्यामुळे शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून १० हजार क्युसेकने विसर्ग वाढविण्यात येणार आहे, असे कोयना धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे.
शिराळा, वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. पूर्व भागातील तासगाव, कवठेमहांकाळ, जत तालुक्यांत रिमझिम पावसाने हजेरी लावली. दिवसभरात कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत अडीच फुटाने वाढ झाली. कृष्णा नदीची पाणीपातळी रात्री स्थिर राहिली. सांगलीतील आयर्विन पुलाच्या पाणीपातळीने दुपारी ४० फुटांची इशारा पातळी ओलांडल्यानंतर रात्री ४०.६ फुटाला स्थिर झाली.
जिल्ह्यात शिराळ्यात सर्वाधिक पाऊस..
जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २४ तासांत सरासरी ४ मिलिमीटर पाऊस झाला असून, शिराळा तालुक्यात सर्वाधिक १९.९ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे- मिरज ६.८ (४४४.४), जत ०.३ (२७३.८), खानापूर ०.७ (३५४.९), वाळवा ३.२ (७०८.८), तासगाव ०.८ (४४२.४), शिराळा १९.९ (११२४.८), आटपाडी ०.२ (२५४.१), कवठेमहांकाळ ०.४ (३८३.६), पलूस १.८ (४९१.६), कडेगाव २ (४७८.३).
धरणातील पाणीसाठा (टीएमसी)
धरण - पाणीसाठा - टक्केवारी
कोयना - ८६.२० - ८१.८४
वारणा - २९.६७ - ८६
धोम - ११.५४ - ८५
कण्हेर - ८.९८ - ७८
अलमट्टी - ६६.५० - ५४