अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे वाहती कृष्णा नदी कोरडी; सांगलीकरांकडून लोकप्रतिनिधी, प्रशासनाचा निषेध 

By अशोक डोंबाळे | Published: January 27, 2024 05:05 PM2024-01-27T17:05:05+5:302024-01-27T17:05:25+5:30

कुणाला खुश करण्यासाठी धरणातील पाणी रोखता, आंदोलकांचा सवाल

Krishna river dry due to inaction of authorities, People representatives, administration protested by Sangli | अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे वाहती कृष्णा नदी कोरडी; सांगलीकरांकडून लोकप्रतिनिधी, प्रशासनाचा निषेध 

अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे वाहती कृष्णा नदी कोरडी; सांगलीकरांकडून लोकप्रतिनिधी, प्रशासनाचा निषेध 

सांगली : कृष्णा नदी अखंडित वाहणारी नदी असताना केवळ अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे नदी कोरडी पडत आहे. कुणाला तरी खुश करण्यासाठी कोयना धरणाचे अधिकारी सांगलीचेपाणी रोखत आहेत, असा आरोपही संतप्त आंदोलकांनी केला. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे सांगलीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, असाही आरोप आंदोलकांनी केला.

मान्सून सुरू झाल्यापासून आतापर्यंत तीनवेळा कृष्णा नदी कोरडी पडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ नागरिक जागृती मंच आणि कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्या नेतृत्वाखाली नागिरकांनी कृष्णा नदीवरील सांगलीतील बंधाऱ्यावर शनिवारी सकाळी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी जलसंपदा विभाग आणि लोकप्रतिनिधीच्या जोरदार घोषणा दिल्या. जलसंपदा विभागाने जिल्ह्याचे हक्काचे पाणी कृष्णेत सोडून ती बारमाही वाहती ठेवावी, अशी मागणी केली. कृष्णा नदी कोरडी पडायचे कोणतेही कारण नाही.

मात्र, राज्याचा जलसंपदा आणि सांगली जलसंपदा विभाग जिल्ह्यावर अन्याय करीत आहे. कोणाला तरी खुश करण्यासाठी धरणातून पाणी सोडले जात नाही. सांगलीच्या हक्काचे पाणी अडवून ठेवून अन्याय करत आहेत. यापुढे सांगलीतील आणि जिल्ह्यातील नागरिक हा अन्याय सहन करणार नाहीत. जर पुन्हा नदी कोरडी पाडण्याचा खेळ झाला तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाच्या परिणामांची जबाबदारी ही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर राहील, असा इशाराही आंदोलकांनी दिला.

नागरिक जागृती मंच जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर, कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, विजयकुमार दिवाण, डॉ. रवींद्र व्होरा, मनोज पाटील, प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, माजी नगरसेवक हनमंतराव पवार, तानाजी सरगर, मोहन चोरमुले, संजय चव्हाण, अजितकुमार पाटील, अविनाश जाधव, उदय पाटील, जयराज बर्गे, गोपाळ मर्दा, अविनाश जाधव, अशोक माने, सतीश दुधाळ, गजानन साळुंखे, अण्णासाहेब शिंदे, संजय वाईंगडे, शीतल वानखंडे, डॉ. अशोक चव्हाण आदी आंदोलनात सहभागी होते.

सांगली जिल्ह्याच्या हक्काचे ३४ टीएमसी पाणी

कोयना धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा ७१ टीएमसी असून विद्युत निर्मितीसाठी ४९ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यापैकी कृष्णा नदीसाठी २२ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. धोम, उरमोडी, तारळी धरणात १२ टीएमसी पाणी आहे. असे एकूण हक्काचे ३४ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्याच्या हक्काचे उपलब्ध आहे. ते पूर्णपणे सोडल्यास येथून पुढे जून अखेरपर्यंत कृष्णा अखंडित वाहती राहू शकते, तरीही कृष्णा नदी कोरडी का पाडली जात आहे, असा संतप्त सवाल सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी उपस्थित केला.

Web Title: Krishna river dry due to inaction of authorities, People representatives, administration protested by Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.