Sangli: कृष्णा नदी कोरडी, वारणा योजनेसाठी लोकप्रतिनिधी लक्ष घालणार?; २५० कोटी निधीची गरज

By शीतल पाटील | Published: October 28, 2023 05:04 PM2023-10-28T17:04:35+5:302023-10-28T17:04:58+5:30

भविष्यात सांगली, कुपवाडकरांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार

Krishna river dry, MP to pay attention to Warna scheme; 250 crore fund requirement | Sangli: कृष्णा नदी कोरडी, वारणा योजनेसाठी लोकप्रतिनिधी लक्ष घालणार?; २५० कोटी निधीची गरज

Sangli: कृष्णा नदी कोरडी, वारणा योजनेसाठी लोकप्रतिनिधी लक्ष घालणार?; २५० कोटी निधीची गरज

शीतल पाटील

सांगली : कृष्णा नदीचे वाढलेले प्रदूषण, पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे भविष्यात सांगली, कुपवाडकरांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार आहे. महापालिकेने वारणा नदीतून सांगली व कुपवाडला पाणी देण्याची योजना आखली आहे. त्यासाठी २५० कोटींचा आराखडाही तयार करण्यात आला आहे; पण अद्याप हा आराखडा शासनाकडे सादर करण्यात आलेला नाही. वारणा पाणी योजनेची गरज लक्षात घेता लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.

माजी मंत्री मदन पाटील यांच्या सत्ताकाळात केंद्र शासनाने यूआयडीएसएसएमटी अंतर्गत सांगली व कुपवाड या दोन शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा बळकटीसाठी ७९.०२ कोटींच्या योजनेला मंजुरी दिली; पण पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागली अन् मदन पाटील यांची सत्ताही गेली. त्यामुळे योजनेचे काम रखडले. नव्याने सत्तेवर आलेल्या विकास महाआघाडीने वारणा उद्भव वगळून शहरातील वितरण व्यवस्था बळकटीकरणावर भर दिला.

पहिल्या टप्प्यातील निधीतून जीवन प्राधिकरणाच्या साहाय्याने कुपवाड झोनमधील कापसे वसाहत, शामनगर, गव्हर्नमेंट कॉलनी, वान्लेसवाडी व वाघमोडेनगर येथे पाण्याची टाकी, जॅकवेल ते माळबंगल्यापर्यंतची दाबनलिका, १०२ किलोमीटर लांबीची वितरण व्यवस्था आदी कामे मार्च २०१४ पर्यंत पूर्ण करण्यात आली. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी वारणेतून पाणी न उचलता नवीन टाकी बांधणे, जलवाहिन्या टाकण्याचे काम केले.

आता पुन्हा कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडू लागले नव्हते. ऑक्टोबर महिन्यातच शहरावर पाणी टंचाईचे सावट आहे. कोयना धरणातून पाणी सोडले नाही तर तीन ते चार लाख लोकसंख्येला पाण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वारणा योजनेची गरज भासू लागली आहे. त्यासाठी २५३ कोटींचा आराखडाही तयार करण्यात आला आहे; पण तो अद्याप शासनाला सादर केलेला नाही.

पाणी माळबंगला केंद्रापर्यंत आणणार

मदनभाऊ युवा मंचाच्या पाठपुराव्यानंतर वारणा योजनेबाबत महासभेतही ठराव झाला. खासगी कंपनीकडून २५३ कोटींचा आराखडा तयार केला जात आहे. सांगलीवाडी-समडोळी हद्दीत जॅकवेलसाठी जागाही घेण्यात आली आहे. वारणा नदीतून पाणी उचलून ते माळबंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले जाणार आहे. त्यासाठी ११ किलोमीटरची जलवाहिनी टाकली जाईल. याशिवाय गावठाणमधील जुन्या जलवाहिन्या बदलून नव्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहे. शिवाय तीन ते चार नवीन पाण्याची टाकीचे नियोजन करण्यात आले आहे.

Web Title: Krishna river dry, MP to pay attention to Warna scheme; 250 crore fund requirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.