जिल्ह्यातील कृष्णा नदीपातळीत वाढ होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:25 AM2021-09-13T04:25:20+5:302021-09-13T04:25:20+5:30
सांगली : कोयना धरणातील पाणीसाठा ९८.७६ टक्के इतका झाला असून धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने कोयनेतून २३ हजार ...
सांगली : कोयना धरणातील पाणीसाठा ९८.७६ टक्के इतका झाला असून धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने कोयनेतून २३ हजार ७८० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कोयना धरणाची साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी असून सध्या १०३.९५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. वारणा धरणातील पाणीसाठाही ९९.८५ टक्के झाला आहे. म्हणजे ही दोन्ही धरणे जवळपास फुल्ल झाली आहेत. त्यामुळे दोन्ही धरणांतून विसर्ग सुरू झाला आहे. वारणा धरणातून ३ हजार ८०२, तर कोयनेतून २३ हजार ७८० क्युसेकने विसर्ग सुरू झाला आहे. येत्या चार दिवसांत कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे हा विसर्ग वाढविलाही जाऊ शकतो. यासाठी पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
चौकट
सांगलीतील पाणीपातळी ९ फुटांवर
सांगलीतील आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी रविवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ९ फूट इतकी होती. उद्या सायंकाळी ६ नंतर कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात होणार आहे. त्यातच येत्या तीन दिवसांत पावसाच्या स्थितीवर विसर्ग अवलंबून राहणार आहे.
चौकट
सांगलीत पावसाची हजेरी
सांगली, मिरज शहरात रविवारी पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण होते. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील पावसाचा जोर वाढणार आहे.
चौकट
जिल्ह्यातील कृष्णेची पाणीपातळी (फूटमध्ये)
ताकारी १२
भिलवडी १०
सांगली ९
अंकली १२.२
म्हैसाळ २३
चौकट
अलमट्टीतूनही विसर्ग सुरू
अलमट्टी धरणातूनही सध्या ४४ हजार ५०९ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊ नये यासाठी दोन्ही राज्यांमध्ये सध्या समन्वय राखला जात आहे.