सांगलीच्या कृष्णा नदीपातळीत वाढ, नागठाणे बंधारा पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 12:40 PM2022-09-19T12:40:27+5:302022-09-19T12:41:03+5:30
सांगलीतील आयर्विनजवळील पातळी २१ फुटांवर गेली आहे.
सांगली : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असली तरी धरणातून विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत गतीने वाढ होत आहे. नागठाणे येथील बंधारा रविवारी पाण्याखाली गेला असून, सांगलीतील आयर्विनजवळील पातळी २१ फुटांवर गेली आहे.
सांगली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून कोयनेतून मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीपातळीत वाढ झाली आहे. रविवारी सायंकाळी विसर्ग निम्म्याने कमी केला आहे. आता १५ हजार ६० क्युसेक विसर्ग सुरू आहे. विसर्ग आणखी कमी होण्याची शक्यता आहे. नदीपातळीत आज, सोमवारपासून मंदगतीने वाढ होईल. विसर्ग थांबल्यानंतर पुन्हा पाणीपातळी घटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सर्वत्र पावसाने उघडीप दिली आहे. गेली दोन दिवस सूर्यदर्शन होत आहे. रविवारी सकाळी नोंदलेल्या आकडेवारीनुसार शिराळा तालुक्यातच ६ मिमी पाऊस झाला असून, अन्यत्र पावसाने उघडीप दिली आहे.
धरण क्षेत्रातही पाऊस थांबला
रविवारी सायंकाळी कोयना धरण क्षेत्रातील पाऊस थांबला आहे. वारणा धरण क्षेत्रातील जोरही घसरला आहे
कृष्णा नदीची पाणीपातळी (रविवारी सायं ७ पर्यंत)
- बहे ८.५ फूट
- ताकारी २३.७
- भिलवडी २२.९
- वसगडे ३
- आयर्विन २१.३
- अंकली २४.८
- म्हैसाळ ३१.१०