Sangli News: सांगा, ‘स्वप्नपूर्ती’ कोणाची..? गोलमाल है, सब गोलमाल है!

By श्रीनिवास नागे | Published: March 22, 2023 04:38 PM2023-03-22T16:38:09+5:302023-03-22T16:53:05+5:30

कमाईत आहेत तरी कोणकोण वाटेकरी?

Krishna river pollution, Argument between MLA Jayant Patil and Vishal Patil over Vasantdada Sugar Factory | Sangli News: सांगा, ‘स्वप्नपूर्ती’ कोणाची..? गोलमाल है, सब गोलमाल है!

Sangli News: सांगा, ‘स्वप्नपूर्ती’ कोणाची..? गोलमाल है, सब गोलमाल है!

googlenewsNext

श्रीनिवास नागे

सांगली : ज्या स्वप्नपूर्ती डिस्टिलरीच्या सांडपाण्यामुळे नदीतले मासे मेले, ज्या डिस्टिलरीच्या कारभारावर आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली, जी डिस्टिलरी बेकायदेशीरपणे (म्हणे हं) स्वप्नपूर्ती शुगर कंपनी चालवत होती आणि ज्या कंपनीला जयंतरावांच्या ताब्यातील जिल्हा बँकेने २६ कोटीचं कर्ज दिलं, त्या ‘स्वप्नपूर्ती’च्या मालकाबद्दल जयंतरावांना आणि बँकेलाही काहीच माहीत नाही म्हणे. बँकेला तर आपल्या ताब्यातील डिस्टिलरी दुसरं कोणीतरी चालवतंय, याचाही मागमूस नाही म्हणे ! गोलमाल है, सब गोलमाल है !

सांगलीत कृष्णा नदीचं पाणी दूषित झाल्यानं मासे मेले. त्याला कारणीभूत ठरली वसंतदादा साखर कारखान्याची डिस्टिलरी चालवणारी स्वप्नपूर्ती शुगर कंपनी. मग प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग आली. त्यांच्या शोधानुसार, डिस्टिलरीचं रसायनयुक्त पाणी नदीत मिसळल्यानं कृष्णा प्रदूषित झाली. त्यांच्या नोटिशीनंतर कारखाना आणि डिस्टिलरी बंद करण्यात आली म्हणे. त्यांचा वीज-पाणीपुरवठाही तोडला. त्यावर विधिमंडळात जिल्ह्याचा कळवळा घेऊन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी डिस्टिलरीच्या मालकालाच हात घातला. पण आडून-आडून.

कारण कागदोपत्री ‘स्वप्नपूर्ती’चे मालक-संचालक आहेत, एका वाहन विक्रेत्या कंपनीचे कर्मचारी. जयंतराव ज्यांना ‘टार्गेट’ करताहेत, ते वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष विशाल पाटील यांचा कायदेशीरदृष्ट्या कागदोपत्री तरी ‘स्वप्नपूर्ती’शी संबंध नाही. मग मालक कसा पुढं येणार? अशी चर्चा घडवून आणण्यातूनच ना? गोलमाल है सब गोलमाल है !
जाता-जाता : जयंतरावांनी बरोबर मोका साधून स्वप्नपूर्ती आणि विशाल पाटलांवर निशाणा साधलाय. वसंतदादा घराण्याचा राजकारणात ‘करेक्ट कार्यक्रम’ करणाऱ्या राजारामबापूंच्या या सुपुत्रानं आता सहकार आणि उद्योगातही दादा घराण्याला पाणी पाजायचं ठरवलंय म्हणायचं, अशा पोस्ट आता व्हायरल होणारच ना?

ताजा कलम : लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडेल. शिवाय लोकसभेला विशाल पाटील उमेदवार असतील, असं बोललं जात असताना जयंतरावांचे पुत्र प्रतीक यांचंही नाव पुढं आलंय. त्यामुळं हा ठोका शेवटचाच आणि समोरचा नेस्तनाबूत, या हिशेबानं तर ‘स्वप्नपूर्ती’वर बंदुकीचा बार डागला गेला नसेल?

बँकेच्या अधिकाऱ्यांवरच फौजदारी केली पाहिजे

आता डिस्टिलरीवर कारवाई होत असताना दहा-बारा दिवस मूग गिळून गप्प बसलेले बँकेचे सीईओ सोमवारी जयंतरावांनीच प्रश्न उपस्थित केल्यानंतर बोलले. ‘बँकेकडं म्हणे डिस्टिलरीचा प्रतीकात्मक ताबा आहे, कोणी ती अनधिकृतपणे चालवत असेल तर माहिती नाही.’ वा रे बहाद्दर !
विशेष म्हणजे मागच्याच महिन्यात पाहणी करून डिस्टिलरी बंद असल्याचा अहवाल बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलाय. मग रासायनिक सांडपाणी नदी कसं गेलं? आणि कारवाई कशी झाली? बँकेच्या अशा अधिकाऱ्यांवरच फौजदारी व्हायला हवी. पण...  गोलमाल है सब गोलमाल है !

सगळ्यांच्याच स्वप्नांची पूर्ती झाली !

वसंतदादा साखर कारखाना डिस्टिलरीशिवाय चालविण्यास द्यायचा, ती निविदा न भरताच दांडगाव्यानं ताब्यात घेण्याचा, डिस्टिलरी सुरू राहण्याकडं डोळेझाक करण्याचा आणि स्वप्नपूर्ती शुगरला कोट्यवधीचं कर्ज देण्याचा व्यवहार बिनबोभाट झाला. त्यावेळी जयंतरावांचे विश्वासू साथीदार दिलीपतात्या पाटील बँकेचे अध्यक्ष, तर विशाल पाटलांसह काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपचे तगडे नेते संचालक मंडळात होते.

हुकूम पाळणारे अधिकारीही होते. त्या काळात अनेकांच्या स्वप्नांची पूर्ती झाली ! आणि आता हे सगळे ‘स्वप्नपूर्ती’बाबत हात वर करताहेत.  गोलमाल... गोलमाल !

डिस्टिलरी न देण्यामागचं इंगित आता कळलं

थकीत कर्जापोटी जिल्हा बँकेने ताब्यात घेतलेला वसंतदादा साखर कारखाना काही वर्षांपूर्वी दत्त इंडिया कंपनीस चालवण्यास दिला, पण कारखान्याची डिस्टिलरी मात्र दत्त इंडियाला दिली नाही.
कारखान्यातील उपपदार्थांवर चालणारी डिस्टिलरी कारखान्यासह चालवण्यास दिली नाही आणि कंपनीनेही घेतली नाही, यामागचं इंगित आता पुढं आलं. ‘स्वप्नपूर्ती’आडून हात धुऊन घेतला सगळ्यांनीच.

कमाईत आहेत तरी कोणकोण वाटेकरी?

जिल्हा बँक मात्र म्हणते की, डिस्टिलरी आमच्याच ताब्यात आहे, ‘स्वप्नपूर्ती’चा तिच्याशी काहीही संबंध नाही. पण प्रत्यक्षात बँकेच्या ताब्यात असलेली डिस्टिलरी ‘स्वप्नपूर्ती’ चालवत होती. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतरांनी ‘स्वप्नपूर्ती’ला परवानाही दिलाय.

मग गेली सहा-सात वर्षं राजरोस डिस्टिलरीतून दारू गाळली जात असताना बँक आणि तिची सूत्रं हलवणारे राज्याचे नेते झोपलेले का? अनधिकृतपणे मद्यार्क निर्मिती होताना बँकेला कुणी गप्प बसवलं होतं? डिस्टिलरीतील बक्कळ कमाईचा वाटा कुणाकुणाला मिळाला? गोलमाल... गोलमाल !

Web Title: Krishna river pollution, Argument between MLA Jayant Patil and Vishal Patil over Vasantdada Sugar Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.