कृष्णा नदी प्रदूषण: दत्त इंडिया कारखाना, स्वप्नपूर्तीची डिस्टलरी अखेर बंद, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका 

By शीतल पाटील | Published: March 15, 2023 01:05 PM2023-03-15T13:05:59+5:302023-03-15T13:06:25+5:30

कृष्णा नदी प्रदुषणाबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यासह भाजपच्या आमदारांनी लक्षवेधी व ताराकिंत प्रश्न उपस्थित केला

Krishna river pollution: Dutt India factory, Swapnapurti distillery finally closed | कृष्णा नदी प्रदूषण: दत्त इंडिया कारखाना, स्वप्नपूर्तीची डिस्टलरी अखेर बंद, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका 

कृष्णा नदी प्रदूषण: दत्त इंडिया कारखाना, स्वप्नपूर्तीची डिस्टलरी अखेर बंद, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका 

googlenewsNext

सांगली : कृष्णा नदीप्रदूषणाची गंभीर दखल घेत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वसंतदादा साखर कारखाना चालविणाऱ्या दत्त इंडिया कंपनीसह स्वप्नपुर्ती शुगर्सला डिस्टलरी बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी डिस्टलरीचा प्रकल्प बंद करण्यात आला. तर रात्री उशिरा साखर कारखानाही बंद करणार असल्याचे दत्त इंडियाचे व्यवस्थापक शरद मोरे यांनी सांगितले. तर महापालिकेने नदी प्रदुषणाची कबुली दिली असली तरी ठोस उपाययोजनाबाबत मात्र मौन पाळले आहे.

दरम्यान, प्रदुषण नियंत्रण मंडळाने महापालिका, दत्त इंडिया व स्वप्नपूर्ती शुगर्सवर फौजदारी दाखल करण्याची तयारी चालविली आहे. चार दिवसांपूर्वी कृष्णा नदीत अंकलीजवळ मासे मृत झाले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाचा स्रोत शोधून काढत दत्त इंडिया कंपनी व स्वप्नपुर्ती शुगर्सला नोटीस बजावली होती. उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी नवनाथ अवताडे यांनी अहवाल महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला पाठविला होता. त्याची दखल घेत दोन्ही कंपन्यांना सोमवारी नोटीस बजावण्यात आली.

वसंतदादा साखर कारखाना सध्या श्री दत्त इंडिया कंपनी चालवित आहे, तर कारखान्याची डिस्टलरी स्वप्नपूर्ती शुगर लिमिटेडकडे आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांनी तातडीने कारखाने बंद करावेत, असे आदेश दिले होते. या आदेशानंतर स्वप्नपूर्ती शुगर्सने डिस्टलरी प्रकल्प बंद केला आहे. तशी लेखी माहिती प्रदुषण नियंत्रण मंडळाला दिली आहे. तर दत्त इंडियाकडून रात्री उशिरा साखर कारखान्याचे गाळप बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

वीज, पाणी तोडण्याचा अहवाल मागविला

प्रदुषण नियंत्रण मंडळाने साखर कारखाना व डिस्टलरी प्रकल्पाचा वीज व पाणीपुरवठा खंडीत करण्याचे आदेश महावितरण कंपनी व पाटंबधारे विभागाला दिले होते. या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी साखर कारखाना व डिस्टलरीला भेट दिली. पण वीज व पाणी पुरवठा तो़डल्याबाबत कुठलाही अहवाल प्रदुषण नियंत्रण मंडळाला सादर केलेला नाही. याबाबत दोन्ही विभागाकडून बुधवारी अहवाल मागविणार असल्याचे अवताडे यांनी सांगितले.

शेरीनाल्याचे पाणी नदीपात्रात

नदी प्रदुषणावरून टीकेची झोड उठली असताना महापालिकेने शेरीनाल्याबाबत ठोस कृती केलेली नाही. मंगळवारीही शेरीनाल्याचे पाणी थेट नदीपात्रात मिसळत होते. दोन पंपाद्वारे सांडपाणी बंधाऱ्याखाली सोडले होते.

विधीमंडळात लक्षवेधी

कृष्णा नदी प्रदुषणाबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यासह भाजपच्या आमदारांनी लक्षवेधी व ताराकिंत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे हा विषय विधीमंडळातही गाजण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Krishna river pollution: Dutt India factory, Swapnapurti distillery finally closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.