सांगलीत कृष्णेने इशारा पातळी गाठली, वारणेला पूर; कोयनेतून ३२,१०० तर वारणेतून १५,७८५ क्युसेकने विसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 01:15 PM2024-07-27T13:15:49+5:302024-07-27T13:17:35+5:30
दोन हजार नागरिक, २७८२ पशुधनाचे स्थलांतर, कृष्णेची पाणीपातळी स्थिरची शक्यता
सांगली : वारणा (चांदोली), कोयना धरणक्षेत्रात शुक्रवारी दुपारपर्यंत पावसाने उघडीप दिल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. पण, सायंकाळीनंतर पुन्हा धरणक्षेत्रासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू झाली. कोयना धरण ७७.७६ टक्के भरल्यामुळे धरणाचे चार दरवाजे उघडून ३२ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. सांगली आयर्विन पूल येथे कृष्णा नदीने ४० फुटांपर्यंतची इशारा पातळी गाठली आहे. वारणा धरण ८९ टक्के भरल्यामुळे तेथूनही १५ हजार ७८५ क्युसेक विसर्ग सुरू आहे.
धरण क्षेत्रासह जिल्ह्यातील धुवाधार पावसामुळे कृष्णा व वारणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडू लागले आहे. सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यांतील १०४ गावांतील नागरिकांच्या चेहऱ्यांवर भीती दिसत आहे. या चार तालुक्यांतील ४९७ कुटुंबांतील दोन हजार ७८२ लोकांचे स्थलांतर केले आहे. सांगलीतील सूर्यवंशी प्लॉट, दत्तनगर, काकानगर, मगरमच्छ कॉलनी, जामवाडी, वखारभाग येथील ५६ कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. हजारो पशुधनालाही सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले असून, नदीकाठची हजारो एकरावरील पिके पाण्याखाली गेली आहेत.
दोन हजार नागरिक, २७८२ पशुधनाचे स्थलांतर..
पूरस्थितीचा धोका असलेल्या वाळवा, मिरज, पलूस आणि शिराळा या चार तालुक्यातील १८ गावांतील नागरिकांनी स्थलांतर केले आहे. शुक्रवार संध्याकाळपर्यंत ४९७ कुटुंबांतील दोन हजार ३५ नागरिकांचे स्थलांतर केले आहे. या नागरिकांना निवारा केंद्र, जिल्हा परिषद शाळांमध्ये राहण्याची सोय केली आहे. दोन हजार ७८२ पशुधन सुरक्षित स्थळी हलविले आहे.
जिल्ह्यात ३४.८ मिलिमीटर पाऊस
जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत सरासरी ३४.८ मिलिमीटर, तर सर्वाधिक शिराळा तालुक्यात ९३.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांतील पाऊस व कंसात १ जूनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे : मिरज ३६.२ (४२०.५), जत ४.५ (२७१.७), खानापूर १८.९ (३३६.८), वाळवा ५७.७ (६४३.६), तासगाव ३०.४ (४१५.८), शिराळा ९३.२ (९४०.५), आटपाडी २.९ (२४३.३), कवठेमहांकाळ १२.५ (३७४.९), पलूस ३१.८ (४५१.८), कडेगाव २३.२ (४३४).
२५ पूल, बंधारे, ४६ रस्ते पाण्याखाली
पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील २५ पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले आहेत. याशिवाय ४६ रस्त्यांवर पाणी आल्याने ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत सायंकाळीही वाढ होत असल्याने आणखी काही रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील पाणीपातळी
पाणी पातळी - फूट इंचांमध्ये
कराडचा कृष्णा पूल २४.०९
बहे पूल १२.११
ताकारी पूल ४३.६
भिलवडी पूल ४२.०६
आयर्विन ४०
अंकली पूल ४३
म्हैसाळ बंधारा ५०
राजापूर बंधारा ४९.०१
राजाराम बंधारा ४५.११