सांगलीत कृष्णा नदी इशारा पातळीखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 07:58 PM2019-08-13T19:58:45+5:302019-08-13T20:01:16+5:30
धरणातील विसर्गही अत्यंत कमी झाल्याने बुधवारी सायंकाळपर्यंत पूरस्थिती पूर्णपणे आटोक्यात येण्याची चिन्हे आहेत. सांगली-कोल्हापूर आणि सांगली-स्लिामपूर हे मुख्य रस्ते खुले झाले.
सांगली : अनेक रस्ते, वस्त्यांना मुक्त करीत कृष्णेच्या महापुराने गतीने उतरण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत नदी इशारा पातळीच्या खाली गेल्याने लोकांनी सुटकेचा श्वास सोडला. धरणातील विसर्गही अत्यंत कमी झाल्याने बुधवारी सायंकाळपर्यंत पूरस्थितीपूर्णपणे आटोक्यात येण्याची चिन्हे आहेत. सांगली-कोल्हापूर आणि सांगली-स्लिामपूर हे मुख्य रस्ते खुले झाले.
कोयना धरणातून मंगळवारी २७ हजार २६५, तर वारणा धरणातून ६१८ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला. दुसरीकडे नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वेगाने खाली सरकत असल्याने पूरस्थिती आता आटोक्यात येत आहे. सांगली-इस्लामपूर, सांगली-कोल्हापूर हे महत्त्वाचे मार्ग मंगळवारी खुले झाले. सांगलीवाडीला बसलेला महापुराचा विळखा आता सुटलेला असल्याने बहुतांश नागरिक त्यांच्या घरी परतले आहेत. शहरभर महापालिकेनेअन्य महापालिका व यंत्रणांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत शहरातील अन्य वस्त्याही महापुरातून मुक्त होण्याची चिन्हे आहेत.