कृष्णा, वारणा महापुराच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:12 PM2019-08-04T23:12:55+5:302019-08-04T23:13:00+5:30
सांगली : कोयना व वारणा धरणातील विसर्ग वाढतच असल्याने कृष्णा, वारणा नद्यांची वाटचाल आता महापुराच्या दिशेने सुरू झाली आहे. ...
सांगली : कोयना व वारणा धरणातील विसर्ग वाढतच असल्याने कृष्णा, वारणा नद्यांची वाटचाल आता महापुराच्या दिशेने सुरू झाली आहे. दोन्ही नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत असल्याने नदीकाठी ‘सतर्कतेचा इशारा’ दिला आहे. जिल्ह्यातील प्रमुख मार्ग, पूल, पिके, घरे पाण्याखाली जात असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
वारणा धरणातून २० हजार ४७२, तर कोयना धरणातून ६१ हजार क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा व वारणा नद्यांच्या पातळीत रविवारी मोठी वाढ झाली. जिल्ह्यात ठिकठिकाणी कृष्णा नदीच्या पाणीपातळीने ‘धोकादायक पातळी’कडे वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २८ प्रमुख मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वेसेवाही विस्कळीत झाल्याने अनेक ठिकाणी प्रवासी अडकून पडले आहेत. जिल्ह्यात भिलवडी, ताकारी, सांगली, मिरज याठिकाणी कृष्णेच्या पुराचे पाणी लोकवस्तीत शिरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले आहे. नदीकाठच्या अनेक नागरिकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. शासकीय स्तरावरही तात्पुरते स्थलांतर सुरू करण्यात आले आहे.
जिल्ह्यात रविवारीही सर्वत्र संततधार सुरूच होती. आटपाडी, जत, खानापूर, कवठेमहांकाळ या दुष्काळी भागासह सांगली, मिरज, शिराळा, वाळवा, तासगांव, पलूस, कडेगाव याठिकाणीही पावसाने हजेरी लावली होती. दिवसभर पावसाची रिपरिप आणि वाढणाऱ्या नदीपातळीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी दुपारपर्यंत जिल्ह्यातील दोन्ही नद्यांच्या काठावरील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत.
----------
जिल्ह्यात ९९३ पूरग्रस्तांचे स्थलांतर
आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडील आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण २४१ कुटुंबांतील ९९३ लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामध्ये वाळवा तालुक्यातील १४४, शिराळा तालुक्यातील ६६, पलूसमधील २६९, मिरज तालुक्यातील ९९ व महापालिका क्षेत्रातील ४१५ इतक्या पूरग्रस्तांचे स्थलांतर करण्यात आले आहे. याशिवाय हजारो लोकांनी स्वत:हून नातेवाईकांकडे स्थलांतर केले आहे. ----------
एकूण २८ मार्ग बंद
जिल्ह्यातील एकूण २८ प्रमुख मार्ग बंद झाले आहेत. त्यामध्ये ६ राज्यमार्ग, १५ प्रमुख जिल्हा मार्ग, ६ इतर जिल्हा मार्ग, १ ग्रामीण मार्गाचा समावेश आहे.
रेल्वे वाहतूक विस्कळीत
कोल्हापूरजवळ पंचगंगा नदीवरील रेल्वेपुलाजवळ धोक्याच्या पातळीपर्यंत पुराचे पाणी आल्याने मिरज-कोल्हापूरदरम्यान होणारी रेल्वे वाहतूक रविवारी दुपारपासून बंद झाली. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
भिलवडी बाजारात पाणी
भिलवडी (ता. पलूस) येथे रविवारी पहाटे कृष्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्याचबरोबर भिलवडी बाजारपेठेसह, मौलानानगर परिसरात पुराचे पाणी घुसले. दिवसभर सुरू असलेला संततधार पाऊस आणि पुराच्या धास्तीमुळे कृष्णाकाठच्या गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
---------------
कृष्णा नदीची पाणीपातळी (फूट)
बहे १६.८
ताकारी ४९.३
भिलवडी ४७.३
सांगली आयर्विन ४१.१०
अंकली ४५.३
म्हैसाळ ५१.६
या मार्गावरील वाहतूक बंद
जिल्ह्यात कांदे-मांगले पूल, अमणापूर पूल, कुंडल-सांगली रोड (खंडाळा, पळशी, कºहाडमार्गे), पुसेसावळी-वांगी-देवराष्टÑे-कुंडल रस्ता, भिलवडी-अंकलखोप रस्ता, सागाव-कांदे रस्ता, मांगले-काखे पूल, कुंडलवाडी-तांदुळवाडी रस्ता, मोरणा नदी पूल, खेर्डेवाडी-तोंडोली-सोहोली (महादेव ओढा), कांदे पूल, माधवनगर-डिग्रज-ब्रह्मनाळ रस्ता, विहापूर नाला (सागरेश्वर ते राज्य महामार्ग १४२ ला जोडणारा), शित्तूर पूल, काखे रस्ता, कडेगाव-इस्लामपूर रस्ता, पुणदी पूल, शिराळा-आरळा-गुढे-सातारा जिल्हा मार्ग, बहे पूल, सागाव-सुरूल पूल, शाळगाव पूल, नेर्ली पूल (कडेगाव ते अपशिंगे रस्ता), चिंचणी पूल (कडेगाव ते पाडळी), कडेगाव ते कºहाड रस्ता, बिळाशी-सागाव ग्रामीण मार्गावरील वारणा नदीवरील पूल बंद झाले आहेत.