कृष्णा ट्रस्ट सभासदांच्या मालकीचा होईपर्यंत लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:35 AM2020-12-30T04:35:52+5:302020-12-30T04:35:52+5:30
शिरटे : कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टप्रमाणे आपलेही संस्थान असावे असे वेड डॉ. इंद्रजित मोहिते यांना लागले होते. त्यामुळे त्यांनी कारखान्याची ...
शिरटे : कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टप्रमाणे आपलेही संस्थान असावे असे वेड डॉ. इंद्रजित मोहिते यांना लागले होते. त्यामुळे त्यांनी कारखान्याची १५० एकर जमीन आणि कृषी महाविद्यालय आपल्या वडिलांच्या नावे असलेल्या ट्रस्टच्या नावे केले होते. परंतु आम्ही सत्तेवर येताच न्यायालयीन लढा लढून महाविद्यालय आणि जमीन पुन्हा कारखान्याच्या मालकीची केल्याचे कृष्णाचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी स्पष्ट केले.
किल्ले मच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी सरपंच मारुतीराव मोरे अध्यक्षस्थानी होते. कृष्णेचे संचालक शिवाजी आवळे, माजी अध्यक्ष सुरेश पाटील, माजी संचालक विनायकराव धर्मे, उपसरपंच राहुल निकम, बाळासाहेब देसाई, विश्वास देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अजितराव साळुंखे यांनी रयत पॅनेलमधून आपल्या समर्थकासह संस्थापक पॅनेलमध्ये प्रवेश केला.
अविनाश मोहिते म्हणाले, गतवेळी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट हडप करण्यासाठीच सहकार आणि रयत पॅनेलचे मनोमिलन झाले होते. ट्रस्ट सभासदांच्या मालकीचा होईपर्यंत लढा उभारणार आहे. डॉ. इंद्रजित मोहिते संस्थापक असलेली यशवंतराव मोहिते पतसंस्था बुडितावस्थेतप्रत आली आहे. तर यशवंत बझारचेही कोट्यवधीचे भागभांडवल बुडण्याची परिस्थिती आहे. संस्था स्थापनेपासून सभासदांना डिव्हीडंड म्हणून एक दमडीही दिलेली नाही.
यावेळी माजी सरपंच धनाजीराव साळुंखे, सचिन कदम, संभाजी मदने, प्रकाश साळुंखे, पंडित माळी, तानाजी यादव, बाळासाहेब जामदार, मधुकर डिसले, बाबासाहेब पाटील, अविनाश पाटील, सुरेश पाटील, हणमंत पाटोळे, सुहास पवार, पोपट चव्हाण, बापूसोा मोहिते, रंगराव कुंभार, सोनू पैलवान आदी उपस्थित होते.