टिकटॉकवर व्हिडीओ अपलोड करताना बहेत तरुण गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 03:28 PM2019-07-29T15:28:29+5:302019-07-29T15:29:44+5:30
बहे (ता. वाळवा) येथील कृष्णा नदीवरील पुलाच्या पश्चिमेस असलेल्या बोटीच्या धक्क्यावरुन सूर मारल्यानंतर १८ वर्षांचा तरुण नदीतील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. हा प्रकार रविवारी दुपारी ३ च्या सुमारास घडला.
इस्लामपूर : बहे (ता. वाळवा) येथील कृष्णा नदीवरील पुलाच्या पश्चिमेस असलेल्या बोटीच्या धक्क्यावरुन सूर मारल्यानंतर १८ वर्षांचा तरुण नदीतील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. हा प्रकार रविवारी दुपारी ३ च्या सुमारास घडला.
सायंकाळी ७ वाजेपर्यंत तरी त्याचा शोध लागला नव्हता. सोशल मीडियावर फेसबुक आणि टिकटॉकवर टाकण्यासाठी साहसी व्हिडीओ बनवायला गेलेल्या या युवकावर स्वत:च पाण्यातून वाहून जाण्याची वेळ आली.
प्रतीक पोपट आवटे (वय १८, मूळ रा. आमणापूर, ता. पलूस, सध्या यल्लम्मा चौक इस्लामपूर) असे पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. तो येथील आपल्या मामाकडे वास्तव्यास होता. फेसबुक आणि टिकटॉकवर व्हिडीओ अपलोड करण्याची प्रतीकसह त्याच्या काही मित्रांना आवड होती. सुटीदिवशी हे चार—पाच मित्र वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपले व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करत होते.
रविवारी दुपारी प्रतीक हा आपल्या काही मित्रांसह बहे येथील कृष्णा नदी परिसरात गेला होता. पुलाच्या पश्चिमेला नदीपात्रातच बोटिंग क्लबसाठी सिमेंटचा चबुतरावजा धक्का तयार करण्यात आला आहे. त्याच्यापुढेच बंधारा आहे. सध्या नदीपात्रात पाण्याचा वेग मोठा आहे. बंधाऱ्याजवळ तर हा वेग जोराचा होता.
प्रतीकने या धक्क्यावरुन पाण्यात सूर मारल्यानंतर तो काही वेळ वर आलाच नाही. त्यामुळे त्याचे मित्र घाबरुन गेले. ५ ते १0 मिनिटांचा कालावधी झाल्यानंतरही प्रतीक वर न आल्याने त्यांनी आरडाओरडा करत मदतीसाठी ग्रामस्थांना बोलावले. मात्र प्रतीकचा शोध लागला नाही.
या घटनेची माहिती पोलिसांना कळाल्यावर पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समाधान लवटे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्याला सुरुवात केली. कृष्णा नदीपात्रातील रामलिंग बेटाच्या उत्तर बाजूने जाणाºया पाण्याच्या वेगवान प्रवाहातून प्रतीक वाहून गेल्याचे काहींनी पाहिले. पोलिसांनी त्या बाजूने शोधमोहीम राबवली. मात्र सायंकाळी ७ वाजेपर्यंत तो सापडला नाही. अंधार पडू लागल्याने पोलिसांनी शोधकार्य थांबवले. सोमवारी सकाळी जीवरक्षक दलाच्या मदतीने पुन्हा प्रतीकचा शोध घेणार असल्याचे पोलीस निरीक्षक देशमुख यांनी सांगितले.