‘कृष्णा’च्या पटावर दिग्गजांच्या चाली !
By Admin | Published: November 2, 2014 10:31 PM2014-11-02T22:31:11+5:302014-11-02T23:29:42+5:30
सहा महिन्यांत निवडणूक : सभासदांपेक्षा नेतेच उतावळे
अशोक पाटील - इस्लामपूर --य. मो. कृष्णा सह. साखर कारखान्याच्या निवडणुकीला सहा महिन्यांचा कालावधी आहे. त्याअगोदरच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह आजी-माजी मंत्र्यांनी आपले लक्ष या रणांगणावर केंद्रित केले आहे. सभासदांचे हित जपण्यापेक्षा ‘कृष्णा’चा ‘वसंतदादा’ कसा होईल, यासाठीच सर्वांची धडपड सुरु आहे. स्वत:च्या दिव्याखाली अंधार पसरलेल्या या नेत्यांनी आधी आपली राजकीय अस्थिरता पाहावी. ‘कृष्णा’ कोणाला द्यायचा याचा निर्णय सभासद घेतील, अशीच चर्चा ऊस उत्पादकांतून आहे.
‘मोहिते-भोसले भाऊ-भाऊ आपण दोघे वाटून खाऊ’ या राजकीय संघर्षातून कारखाना, सभासद आणि कर्मचाऱ्यांची वाट लागली आहे. यातूनच उद्रेक होऊन तिसरे नेतृत्व उदयास आले. सभासदांनीही नेवे नेतृत्व असलेल्या अविनाश मोहिते यांच्याकडे साखर कारखान्याची जबाबदारी दिली. अविनाश मोहिते यांना या उद्योगाचा अनुभव नसल्याने कारखाना मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी केला आहे. त्यांनी आता सभासदांशी थेट संपर्क ठेवण्यास सुरुवात केली आहे. गत निवडणुकीत त्यांच्याचबरोबर असलेले भोसले पिता-पुत्र विधानसभा निवडणुकीत चांगलेच बॅकफूटवर गेल्याने त्यांची साथ घ्यायची की नाही, याबाबतचा निर्णय मोहिते यांनी घेतलेला नाही. त्यामुळे मोहिते-भोसले गटाचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत.
दक्षिण महाराष्ट्रात सहकारी क्षेत्रात नावाजलेल्या या कारखान्याची आर्थिक उलाढाल पाहता, यावर आपला वरचष्मा असावा म्हणून सातारा, सांगली जिल्ह्यातील नेत्यांची करडी नजर नेहमीच असते. यामध्ये प्रामुख्याने माजी मंत्री जयंत पाटील, पतंगराव कदम, माजी आमदार विलासराव उंडाळकर यांच्यासह आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपला कऱ्हाडात मुक्काम वाढविला आहे.
चव्हाण आणि आमदार पतंगराव कदम यांनी डॉ. इंद्रजित मोहिते यांना ताकद देण्याचे निश्चित केले असले तरी, अविनाश मोहिते यांच्या पाठीशी साखरसम्राटांचे नेते माजी मंत्री जयंत पाटील आणि विलासराव उंडाळकर यांची ताकद असल्याची चर्चा आहे. तसेच भोसले पिता-पुत्र भाजपमध्ये गेल्याने त्यांची साथ घ्यायची की नाही, याबाबत इंद्रजित मोहिते व त्यांच्या समर्थकांमध्ये मंथन सुरु आहे.
गळीत हंगाम तोंडावर आला आहे. ऐन गळीत हंगामातच ‘कृष्णा’च्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे सत्ताधारी सभासदांचे हित जपण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत, तर विरोधातील डॉ. इंद्रजित मोहिते हे कारखाना कसा डबघाईस निघाला आहे, याचा डांगोरा पिटण्यास सुरुवात करणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणूक ही अविनाश मोहिते विरुध्द डॉ. इंद्रजित मोहिते अशीच रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
जयंत पाटील, विलासकाकांचे पाठबळ !
दक्षिण महाराष्ट्रात सहकारी क्षेत्रात नावाजलेल्या कृष्णा साखर कारखान्याची आर्थिक उलाढाल पाहता, यावर आपला वरचष्मा असावा म्हणून सातारा, सांगली जिल्ह्यातील नेत्यांची करडी नजर नेहमीच असते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आमदार पतंगराव कदम यांनी डॉ. इंद्रजित मोहिते यांना ताकद देण्याचे निश्चित केले असले तरी, अविनाश मोहिते यांच्या पाठीशी साखरसम्राटांचे नेते व माजी मंत्री जयंत पाटील आणि विलासराव उंडाळकर यांची ताकद असल्याची चर्चा आहे.