विणीच्या हंगामात कृष्णाकाठच्या मगरी बनताहेत आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:27 AM2021-05-10T04:27:01+5:302021-05-10T04:27:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिलवडी : चोपडेवाडी (ता. पलूस) येथील नम्रता मारुती मोरे या महिलेवर ७ मे रोजी मगरीने हल्ला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : चोपडेवाडी (ता. पलूस) येथील नम्रता मारुती मोरे या महिलेवर ७ मे रोजी मगरीने हल्ला केला होता. प्रसंगावधानामुळे मगरमिठीतून त्यांची सुटका झाली. मे महिन्याअखेर मगरींचा विणीचा हंगाम सुरू आहे. अंडी व पिलांच्या रक्षणासाठी त्या प्रचंड संवेदनशील व आक्रमक बनत असल्याचे चित्र पलूस तालुक्यात कृष्णा नदीकाठावर दिसून येत आहे.
चाेपडेवाडी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पलूस तालुका वनविभागाचे परिमंडल अधिकारी मारुती ढेरे, क्षेत्र अधिकारी शहाजी ठोरे यांनी कृष्णा नदीकाठच्या आमणापूर, धनगाव, अंकलखोप, भिलवडी, चोपडेवाडी, ब्रह्मनाळ आदी गावांना भेटी दिल्या. आमणापूर येथील कोंडार
परिसरात मगरींचा मुक्तसंचार दिसून आला. या परिसरातील काळ्या ओढ्यालगत भीमराव घाडगे यांच्या मळीत १४ फूट लांबीच्या मगरीने अंडी घालण्यासाठी जागा केली असल्याचे प्राणिमित्र संदीप नाझरे यांनी निदर्शनास आणून दिले. मगरीने नदीपात्रापासून उंचीवर अंडी घातल्यास पाऊस चांगला होणार असे संकेत मिळत असल्याचे संदीप नाझरे यांनी सांगितले. भिलवडीच्या पश्चिमेस अंकलखोप हद्दीतील पोटमळीमध्ये एक अजस्र मगर छोट्या पिलांसोबत असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले आहे.
आमणापूर, धनगाव, अंकलखोप, भिलवडी, चोपडेवाडी, ब्रह्मनाळ परिसरात ज्या ठिकाणी माणूस किंवा प्राण्यांची वर्दळ नाही, अशा शांत ठिकाणी मगरींचा अधिवास आहे. ज्या ठिकाणी कोणताच त्रास होणार नाही, अशा ठिकाणी खोल खड्डा खोदून त्यात मगरी अंडी घालतात व उबवतात. शक्यतो, मे व जून हे दोन महिने विणीच्या हंगामात तिच्या हद्दीत कोणीही आले तर मगर आक्रमक होते. या दोन महिन्यांव्यतिरिक्त मगर शांत दिसतात. हल्ल्याच्या घटनाही क्वचितच घडतात.
कृष्णा नदी मगरींच्या नैसर्गिक अधिवासासाठी योग्य आहे. नागरिकांच्या मागणीनुसार सर्वच मगरी पकडून त्यांना दुसरीकडे सोडणे शक्य नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
चौकट
दोन महिने सावधानता बाळगा..
कृष्णा नदीकाठच्या गावात संवेदनशील ठिकाणी वनविभागाने मगरीपासून सावधानता बाळगण्याबाबत सूचना देणारे फलक लावले आहेत. मे व जून महिन्यांच्या कालावधीत शेतकरी, कपडे धुणाऱ्या महिला, पाण्यासाठी व पोहण्यासाठी जाणारे नागरिक, तसेच मच्छीमारांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
फोटो :
आमणापूर येथे आढळलेली १४ फूट लांबीची मगर..
(छाया : संदीप नाझरे)