कृष्णेची पाणीपातळी तीन फुटांनी उतरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:18 AM2021-06-19T04:18:40+5:302021-06-19T04:18:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात तीन दिवस धो-धो बरसणाऱ्या पावसाचा शुक्रवारी काही प्रमाणात जोर ओसरला. कृष्णा नदीची सांगलीतील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात तीन दिवस धो-धो बरसणाऱ्या पावसाचा शुक्रवारी काही प्रमाणात जोर ओसरला. कृष्णा नदीची सांगलीतील आयर्विन पूल येथे २३ फुटांवर असणारी पाणीपातळी शुक्रवारी सायंकाळी तीन फुटाने उतरून २० फुटावर आली. कृष्णा, वारणा नदीची पाणीपातळी उतरल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. कृष्णा आणि वारणा नद्यांवरील १७ बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत.
कोयना, वारणा-चांदोली धरण क्षेत्रासह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. सांगली शहरासह वाळवा आणि शिराळा तालुक्यात अतिवृष्टी तर अन्यत्र संततधार पाऊस सुरू राहिल्याने कृष्णा आणि वारणेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. सांगलीच्या आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी २३ फुटांवर पोहोचली होती. नदीकाठावर पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली होती. महापालिका प्रशासनासह नदीकाठच्या गावातील ग्रामसेवकांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. मात्र, शुक्रवारी दिवसभर पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी संध्याकाळी सांगलीत तीन फुटांनी कमी होऊन २० फूट झाली होती. पातळी कमी होताच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
जिल्ह्यात मुसळधार बरसणाऱ्या पावसाचा जोर शुक्रवारी काहीसा ओसरला. वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, मिरज, तासगाव तालुक्यात पावसाची संततधार सुरू होती. कवठेमहांकाळ, खानापूर या तालुक्यातील काही गावांत जोरदार पाऊस झाला. आटपाडी आणि जत तालुक्यातही रिमझिम पावसाने हजेरी लावली. काहीवेळा पावसाने उघडीप दिली. त्यानंतर सूर्यदर्शनही झाले होते. मात्र, सायंकाळी पुन्हा पावसाचा जोर वाढला. संततधार पावसामुळे ओढे, नाले, शेतातील सरी तुडुंब भरून वाहत आहेत.
चौकट
कृष्णा, वारणा नदीवरील १७ बंधारे पाण्याखाली
कृष्णा नदीवरील नागठाणे, बहे व म्हैसाळसह नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वारणा नदीवरील मांगले-सावर्डे, दुधगाव, चिंचोली, तांदूळवाडी, चावरे, शिगाव आणि दानोळी हे बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
चौकट
जिल्ह्यात १७.५ मिलिमीटर पाऊस
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १७.५ मिमी पावसाची नोंद झाली. शिराळा तालुक्यात सर्वाधिक ३४.९ मिमी पाऊस झाला. दि. १ जूनपासून पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढील: मिरज १८.८ (१९०.९), जत ४.७ (११५.७), खानापूर-विटा ३.९ (६४.७), वाळवा ३४.७ (२०१.९), तासगाव ११.९ (१३१.७), शिराळा ३४.९ (२५६.६), आटपाडी ०.२ (६४.४), कवठेमहांकाळ ११.२ (१०८), पलूस २३.५ (१९२.१), कडेगाव १०.१ (१३२.८).
चौकट
धरण क्षेत्रात पावसाचा जोर
कोयना धरण क्षेत्रात चोवीस तासांत १४२ मिलिमीटर पाऊस झाला. धरणात ३५.९८ टीएमसी पाणीसाठा असून, विद्युतगृहातून दोन हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. वारणा पाणलोट क्षेत्रामध्ये ८० मिलिमीटर पाऊस झाला. धरणात १६.१८ टीएमसी पाणीसाठा असून, एक हजार ६०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.