महाराष्ट्र-कर्नाटकला जोडणारा कुडची पूल पाण्याखाली, 'या' मार्गे वाहतूक सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 02:04 PM2022-08-19T14:04:09+5:302022-08-19T14:05:46+5:30
कृष्णेत पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने पूल रिकामा होण्यास किमान आठवडा लागण्याची शक्यता.
सांगली : महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणारा कुडची (ता. रायबाग) पूल पाण्याखाली गेला आहे. कर्नाटकात जाण्यासाठी अंकली किंवा अथणी मार्गाचा वापर करावा लागत आहे. कृष्णा नदीचे पाणी कुडची पुलावरुन सुमारे चार फूट उंचीने वाहत आहे. सध्या हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णत: बंद झाला आहे.
सांगली-मिरजेतून जमखंडी, रायबाग, मायाक्का चिंचली, हारुगिरी, रबकवी, बनहट्टी आदी भागात जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. मिरजेतून जमखंडी, रायबागला जाण्यासाठी कागवाड, अंकलीमार्गे प्रवास करावा लागत आहे. त्याशिवाय मंगसुळी, अथणीमार्गेही वाहने जात आहेत. मायाक्का चिंचलीला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा रस्ता मात्र बंद झाला आहे.
कृष्णेत पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने पूल रिकामा होण्यास किमान आठवडा लागण्याची शक्यता आहे. यादरम्यान पाऊस वाढला, तर मात्र रस्ता बंदच राहील. नवा पर्यायी उंच पूल उभारण्याचे काम मंद गतीने सुरु आहे.