कुमठेच्या तरुणाचा खून कवलापूरच्या विमानतळावर!
By admin | Published: March 3, 2017 11:45 PM2017-03-03T23:45:51+5:302017-03-03T23:45:51+5:30
जेवणाचा बहाणा : डोक्यात लोखंडी पाईप घातली; मृतदेह मोटारीतून नेला; ग्रामीण पोलिसांचे कोल्हापूर जिल्ह्यात छापे
सांगली : कुमठे (ता. तासगाव) येथील सागर नामदेव गावडे (वय २७) या तरुणाचा कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळावर खून केल्याची कबुली अटकेत असलेल्या संशयितांनी दिली. ‘कवलापुरातील नातेवाईकांच्या घरी कार्यक्रम असून, तिथे जेवायला जाऊया’, असा बहाणा करुन सागरला विमानतळावर नेऊन, त्याच्या डोक्यात लोखंडी पाईप घालून त्याचा खून केला. या घटनेनंतर संशयितांनी त्याचा मृतदेह कोष्टी मळ्याजवळ नेऊन अपघाताचा बनाव केल्याची माहिती सांगली ग्रामीण पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.
गेल्या महिन्यात सांगली-कुमठे रस्त्यावर कोष्टी मळ्याजवळ सागरचा मृतदेह आढळला होता. त्याची दुचाकी रस्त्याकडेला पडली होती. तोही रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याचा अपघाती मृत्यू झाला असेल, अशी शक्यता होती. पण त्याची दुचाकी सुस्थितीत असल्याने अपघाताबद्दल पोलिसांना संशय आला. उत्तरीय तपासणीत सागरच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराचा घाव घातल्याचे स्पष्ट झाले. तेथून पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाली. सागरच्या नातेवाईकांनीही, त्याचा मृत्यू घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. त्याआधारे पोलिसांनी तपास सुरु ठेवला. तब्बल पंधरा दिवसांच्या तपासानंतर सागरचा खून झाल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी उत्तम आनंदा गावडे (वय ३८, रा. रेंदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) व गणेश विठ्ठल बर्गे (३०) या दोघांना अटक केली होती. सध्या ते पोलिस कोठडीत आहेत.
सागर व संशयित बर्गे हे दोघे उत्तम गावडे याच्याकडे रेंदाळ येथे कामाला होते. उत्तमचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. काही दिवसांपूर्वी हे संबंध उघड झाले. त्याची चर्चाही झाली. हे संबंध उघड करण्यामागे सागरच कारणीभूत असल्याचे उत्तमला समजले. त्याच्यामुळे आपली बदनामी झाल्याचा उत्तमला राग होता. याचा बदला घेण्यासाठी त्याने सागरची ‘गेम’ करण्याचे ठरविले. यासाठी त्याने बर्गेची मदत घेतली. बर्गेच्या सांगण्यावरुन उत्तमने सागरला कवलापूरच्या नियोजित विमानतळावर मारण्याचे ठरविले. त्यानुसार या दोघांनी सागरला, ‘कवलापूरला नातेवाईकांच्या घरी कार्यक्रम असून, तिथे जेवायला जायचे आहे’, असे सांगून त्याला माळाजवळ बोलावून घेतले. सागर दुचाकीवरुन तेथे आला. विमानतळमार्गे जाऊ, असे सांगून त्याला माळावर मध्यभागी नेले. उत्तम व बर्गे मोटारीत होते. सागर त्यांच्यामागे दुचाकीवरुन गेला होता. (प्रतिनिधी)