सांगली जिल्ह्यातील कुंडल, खंडोबाचीवाडी गावास ‘राष्ट्रीय पंचायत’ पुरस्कार; देशात आले प्रथम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 04:23 PM2023-04-08T16:23:34+5:302023-04-08T16:23:58+5:30
राष्ट्रपती यांच्या हस्ते दिल्लीत दि. १७ एप्रिल रोजी प्रत्येक एक कोटी रुपये देऊन सन्मान करण्यात येणार
सांगली : राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२३ दीनदयाळ उपाध्याय पंचायत विकास या पुरस्काराची घोषणा शुक्रवारी केेंद्र शासनाकडून केली आली. या पुरस्कारासाठी राज्यातील तीन गावांची निवड झाली असून, पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी आणि कुंडल हे देशात प्रथम आले आहे. राष्ट्रपती यांच्या हस्ते दिल्लीत दि. १७ एप्रिल रोजी प्रत्येक एक कोटी रुपये देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
खंडोबाचीवाडी आणि कुंडल गावांनी मूलभूत विकासाची मोठ्या प्रमाणात काम केली आहेत. गावामधील विकासकामे आणि विविध उपक्रमाची केंद्रीय समितीकडून तपासणी झाली होती. या तपासणीनंतर शुक्रवारी केंद्र शासनाने पुरस्काराची घोषणा केली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील अन्य सहा गावांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडीला ‘गरिबी मुक्ती आणि राहणीमान उंचावलेले पंचायत’ या योजनेत देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे, तसेच याच तालुक्यातील कुंडलने ‘स्वच्छ आणि हरित ग्रामपंचायत अभियानात’ देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी एक कोटी रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे.
१७ एप्रिल रोजी गावांचा होणार गौरव
सोमवार, दि. १७ रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना निमंत्रित केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गावांचा गौरव केला जाणार आहे. या पुरस्कारातून मिळणाऱ्या निधीतून गावातील अनेक विकासकामांना गती मिळणार आहे.