कुंडलच्या मुलीचा टॉवेलने फास बसून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 12:33 AM2019-10-07T00:33:32+5:302019-10-07T00:33:45+5:30
पलूस : कुंडल (ता. पलूस) येथील अक्षरा अमोल जाधव (वय ११) या मुलीचा खेळत असताना गळ्याला टॉवेलचा फास बसल्याने ...
पलूस : कुंडल (ता. पलूस) येथील अक्षरा अमोल जाधव (वय ११) या मुलीचा खेळत असताना गळ्याला टॉवेलचा फास बसल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. ३) भोपाळ (मध्य प्रदेश) येथे घडली. शनिवारी दुपारी कुंडल येथे तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुंडल येथील अमोल जाधव हे भारतीय लष्करात सेवा बजावत आहेत. दोन वर्षांपासून ते भोपाळ (मध्य प्रदेश) येथे कर्तव्यावर आहेत. त्यांच्याबरोबर पत्नी पल्लवी, मुलगी अक्षरा व मुलगा शिवम (वय ७) हेही भोपाळ येथे सोबत राहतात. अक्षरा ही सैन्यदलाच्या शाळेत पाचवीच्या वर्गात शिकत होती. गुरुवारी (दि. ३) सकाळी नेहमीप्रमाणे अमोल कर्तव्यावर गेले, तर काही वेळाने त्यांची पत्नी पल्लवी याही शिवणक्लाससाठी बाहेर पडल्या.
सध्या नवरात्रीची सुटी असल्याने अक्षरा व शिवम् हे बहीण-भाऊ घरात खेळत होते. खेळता-खेळता अक्षरा खिडकीवर चढली. खिडकीवर असणाऱ्या टॉवेलचा तिच्या गळ्याला फास बसला आणि तोल जाऊन ती खिडकीला लटकली. हे पाहून लहानग्या शिवमला काहीच कळेना. त्याने बहिणीला हाक मारली; पण ती काहीच उत्तर देत नाही हे पाहून त्याने शेजारीच राहणाºया महिलेला बोलावले. त्यांनी अमोल यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यांनी तत्काळ येऊन अक्षराला सैन्य दलाच्या रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
उत्तरीय चाचणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. गुरुवारी तिचा मृतदेह घेऊन जाधव कुटुंबीय कुंडल येथे पोहोचले. दुपारी शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.