संखमध्ये अपघातात कुपवाडचे दोघे ठार, मोटारसायकल खड्ड्यात कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 10:41 AM2018-12-21T10:41:16+5:302018-12-21T10:44:19+5:30
संख (ता. जत) येथे मोटारसायकल अपघातात कुपवाडचे दोघेजण जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी रात्री संख-तिकोंडी रस्त्यावरील तलाव फाटा येथे घडली. सुहास दशरथ गंभीरे (वय २७, रा. रामकृष्णनगर, कुपवाड), भालचंद्र सिद्राम तिगनीबिद्री (३७, रा. दत्तनगर, बामनोली-कुपवाड, मूळ गाव नंदरगी, ता. इंडी, जि. विजापूर) अशी मृतांची नावे आहेत. उमदी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
संख : संख (ता. जत) येथे मोटारसायकल अपघातात कुपवाडचे दोघेजण जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी रात्री संख-तिकोंडी रस्त्यावरील तलाव फाटा येथे घडली. सुहास दशरथ गंभीरे (वय २७, रा. रामकृष्णनगर, कुपवाड), भालचंद्र सिद्राम तिगनीबिद्री (३७, रा. दत्तनगर, बामनोली-कुपवाड, मूळ गाव नंदरगी, ता. इंडी, जि. विजापूर) अशी मृतांची नावे आहेत. उमदी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
सुहास गंभीरे
कुपवाडहून भालचंद्र तिगनीबिद्री व सुहास गंभीरे मोटारसायकलने (एमएच १० बी. टी. २१९२) नंदरगी येथे एका कार्यक्रमासाठी चालले होते. संख-तिकोंडी रस्त्यावर तलाव फाटा येथे मोठे वळण आहे. या वळणावर मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने ती रस्त्याकडेच्या खड्ड्यात जाऊन कोसळली.
भालचंद्र तिगनीबिद्री
यामध्ये दोघांनाही गंभीर दुखापत झाली होती. रात्रीची वेळ असल्याने रहदारी कमी असल्यामुळे अपघाताची माहिती कोणाला समजू शकली नाही. मदत न मिळाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ग्रामस्थांनी ही माहिती पोलीस पाटील यांना दिली. यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मृतांकडील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली.
भालचंद्र तिगनीबिद्री कुपवाड येथील बी. आर. इंजिनिअरिंग कंपनीचे मालक आहेत, तर सुहास गंभीरे मूळचे बीड येथील असून, मराठा स्वराज्य संघाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांची घरची परिस्थिती गरिबीची आहे. ते मामाच्या चटई कारखान्यात काम करत होते.
डोहाळे जेवण कार्यक्रमापूर्वी मृत्यू
भालचंद्र यांच्या दुसऱ्या पत्नीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम त्यांच्या नंदरगी गावी होता. त्यासाठी त्यांनी पत्नीला दोन दिवसांपूर्वी गावी पाठविले होते. या कार्यक्रमाला पोहोचण्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.