कुपवाडमधील तरुणाचे एक कोटीच्या वसुलीसाठी अपहरण, पोलिसांकडून छडा; सहा जणांना अटक

By शरद जाधव | Published: October 7, 2022 10:31 PM2022-10-07T22:31:20+5:302022-10-07T22:31:55+5:30

प्रणव नामदेव पाटील असे सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने विटा- तासगाव रस्त्यावर पाठलाग करून सहा जणांना अटक केली.

Kupwad youth abducted for Rs 1 crore ransom, Six people were arrested | कुपवाडमधील तरुणाचे एक कोटीच्या वसुलीसाठी अपहरण, पोलिसांकडून छडा; सहा जणांना अटक

कुपवाडमधील तरुणाचे एक कोटीच्या वसुलीसाठी अपहरण, पोलिसांकडून छडा; सहा जणांना अटक

googlenewsNext

सांगली : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने कुपवाडमधील तरुणाच्या झालेल्या अपहरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या तब्बल १ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी, गुंतवणूक करून घेणाऱ्याच्या भावाचे अपहरण करून त्यास ओलीस ठेवण्यात आले होते.  प्रणव नामदेव पाटील असे सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने विटा- तासगाव रस्त्यावर पाठलाग करून सहा जणांना अटक केली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये राजू रावसाहेब काळे (वय २८ रा. शरदनगर, कुपवाड), सागर सुखदेव कोळेकर (३३ रा. वाघमोडेनगर, कुपवाड), किरण शंकर लोखंडे (२३, रा. बामणोली, ता. मिरज), सोन्या ऊर्फ बापू हरी येडगे (२७, रा. बामणोली), संदेश रामचंद्र घागरे (१९) आणि कल्पेश दिनकर हजारे (२१ रा. दोघेही वाघमोडेनगर, कुपवाड ) यांचा समावेश आहे.

बुधवार दि. ५ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास कुपवाड येथून प्रणव पाटील याचे अपहरण करण्यात आले होते. पाटील यांची पत्नी वैष्णवी प्रणव पाटील यांनी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाला माहिती मिळाली की, संशयित प्रणव यास तासगावच्या दिशेने घेऊन जाणार आहेत. त्यानुसार विटा-तासगाव रस्त्यावर नाकाबंदी लावली होती. प्रत्येक वाहन तपासूनच पुढे सोडण्यात येत होते. याचवेळी संशयितांची मोटार या ठिकाणी आली. नाकाबंदी सुरू असल्याचे चालकाच्या अचानक लक्षात आल्याने त्याने पोलिसांसमोरच भरधाव वेगाने वाहन घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना अडवत सर्वांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली. यावेळी त्यांनी संबधित घटनेची कबुली दिली.

एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश पाटील, नीलेश कदम, गजानन जाधव, संदीप पाटील, शशिकांत जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

एक कोटींच्या वसुलीसाठी प्लॅन
संशयित सागर कोळेकर याने प्रणवचा भाऊ पंकज याच्याकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी १ कोटी रुपये दिले होते. गावातील काही जणांकडून पैसे घेऊन त्याने ते गुंतवले होते. मात्र, गुंतवलेल्या पैशाचे काय झाले? अशी विचारणा पंकजकडे केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यामुळे पैसे बुडाले असणार या शक्यतेने त्यांनी १ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी हा प्लॅन केला होता.
 

Web Title: Kupwad youth abducted for Rs 1 crore ransom, Six people were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.