कुपवाडचे वादग्रस्त तलाठी किरण कवाळे निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:27 AM2021-03-17T04:27:36+5:302021-03-17T04:27:36+5:30
कुपवाड : शहरातील वादग्रस्त तलाठी किरण राजेंद्र कवाळे यांना बेशिस्तपणाच्या कारणावरून मिरजेचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी बुधवारी सायंकाळी ...
कुपवाड : शहरातील वादग्रस्त तलाठी किरण राजेंद्र कवाळे यांना बेशिस्तपणाच्या कारणावरून मिरजेचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी बुधवारी सायंकाळी निलंबित केले. अप्पर तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांनी पाठविलेल्या बेशिस्तपणाच्या अहवालावरून शिंगटे यांनी ही कारवाई केली आहे.
कुपवाड तलाठी कार्यालयातील तलाठी किरण कवाळे कार्यालयात उपस्थित नसतात, मोबाईल बंद असतो, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करत नाहीत, महसूल विभागाची प्रतिमा मलीन होत असल्याच्या सूचना देऊनही त्यांच्या कामात सुधारणा होत नव्हती, त्यामुळे अप्पर तहसीलदार पाटील यांनी तलाठी कवाळे यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचा अहवाल मिरजेचे प्रांताधिकारी शिंगटे यांच्याकडे पाठविला होता.
त्यानुसार प्रांताधिकाऱ्यांनी कवाळे यांना नोटीस बजावली होती. कवाळे यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे वेळेवर खुलासा सादर केला नव्हता. त्यामुळे अखेर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांच्या आधारे त्यांना शिंगटे यांनी निलंबित केले असून त्यांच्याविरोधात विभागीय चौकशीचा आदेशही दिला आहे.
दरम्यान, तलाठी कवाळे यांच्या मनमानी व वादग्रस्त गैरकारभाराविरुद्ध माजी आमदार प्रा. शरद पाटील, कुपवाड शहर भाजपचे अध्यक्ष रवींद्र सदामते यांनी तक्रारी केल्या होत्या. तलाठी कवाळे यांना निलंबित केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.