कुसुम सोलरचे संकेतस्थळ शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी, सरकारी यंत्रणेबद्दल संतप्त प्रतिक्रिया
By अशोक डोंबाळे | Updated: June 23, 2023 18:36 IST2023-06-23T18:33:59+5:302023-06-23T18:36:24+5:30
प्रशासनाकडून सहकार्य होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

कुसुम सोलरचे संकेतस्थळ शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी, सरकारी यंत्रणेबद्दल संतप्त प्रतिक्रिया
सांगली : पंतप्रधान सौर कुसुम योजनेंतर्गत कृषिपंप घेण्यासाठी शेतकरी धावपळ करीत असले तरी महाऊर्जा संकेतस्थळाला आलेल्या मरगळीमुळे ही योजना डोकेदुखी ठरत आहे. जिल्ह्यासाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी एक हजार ६३० सोलर पंपांचे उद्दिष्ट आले आहे. पण, संकेतस्थळ वारंवार बंद पडत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून सरकारी यंत्रणेबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
अर्ज करताना आधार नंबर, भ्रमणध्वनी, गाव, जिल्हा, जात प्रवर्ग आदी माहिती भरून शंभर रुपये कपात होऊनही पुढील पेज उघडत नाही. कपात झालेले पैसेही मिळत नसल्याने शेतकरी, सीएससी केंद्र चालक कंटाळले असून यावर शासनाने उपाय काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. कृषिपंपांना सौर ऊर्जेचे बळ देण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी होते आहे.
दरवर्षी राज्यासाठी एक लाख सौर कृषिपंप बसविण्याचे उद्दिष्ट असून १७ मेपासून संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आलेले आहे. विकास अभिकरणाच्या महाऊर्जा या संकेतस्थळाला अडचणी निर्माण होत. अनेकवेळा संकेतस्थळ चालत नाही. त्याचबरोबर ऑनलाइन काम करणाऱ्या सीएससी केंद्र चालकांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कुसुम सोलर योजनेसाठी सांगली जिल्ह्यासाठी एक हजार ६३० उद्दिष्ट असून संकेतस्थळाच्या दोषाबद्दल तक्रारी आहेत. त्यानुसार पुणे कार्यालयाकडे माहिती पाठविली आहे. लवकरच त्यात सुधारणा होईल. -समुद्रगुप्त पाटील, विभागीय महाव्यवस्थापक, महाऊर्जा कार्यालय.