कुसुमताई नायकवडी यांचे कार्य नव्या पिढीसाठी प्रेरक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:19 AM2021-07-18T04:19:32+5:302021-07-18T04:19:32+5:30
ओळ : वाळवा येथे कुसुमताई नायकवडी यांच्या स्मारकस्थळी वैभव नायकवडी यांच्यासह कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. ...
ओळ : वाळवा येथे कुसुमताई नायकवडी यांच्या स्मारकस्थळी वैभव नायकवडी यांच्यासह कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : गंगेसारख्या निर्मळ आणि हिमालयासारख्या उत्तुंग आई-वडिलांना आपण पोरके झालो आहोत. नागनाथअण्णांसारख्या वादळाला कुसुमताई नायकवडी यांनी ८८ वर्षे साथ दिली. माईंनी आदरयुक्त धाक व दरारा कायम ठेवला होता. त्यांचे कार्य नव्या पिढीसाठी प्रेरक आहे, असे प्रतिपादन कुसुमताई नायकवडी यांच्या कन्या, जिजामाता विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका विशाखा कदम यांनी केले.
वाळवा येथे हुतात्मा विद्यालयाच्या सभागृहात कुसुमताई नायकवडी यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ऑनलाईन सभेत त्या बोलत होत्या. जयप्रभा घोडके प्रमुख पाहुण्या, तर वैभव नायकवडी सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
जयप्रभा घोडके म्हणाल्या, नागनाथअण्णा एक झंझावाती वादळ हाेते. या वादळाशी लग्न करून माईंनी आपल्या संसाराची ज्योत अखंड तेवत ठेवली. माईंच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. स्त्री शिकली तर समाज संस्कारित होईल हे ओळखून कुसुमताई नायकवडी यांनी मुलींसाठी जिजामाता विद्यालयाची स्थापना केली. हे विद्यालय संस्काराचे ज्ञानपीठ बनविले.
वैभव नायकवडी म्हणाले, प्रत्येकाची आई ही आईच असते. कुसुमताई यांना कष्टाच्या बाबतीत कधीही कमीपणा वाटला नाही. वाचन हे आईचे खाद्य होते. वेळेच्या बाबतीत त्यांनी कधीही तडजोड केली नाही.
प्रा. एस. आर. पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी कुसुमताई नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान, स्मारकस्थळी पुष्पचक्र अर्पण करून कुसुमताईंना अभिवादन करण्यात आले. जिजामाता विद्यालयाचे शिक्षक सागर चिखले यांनी स्वागत केले. मुख्याध्यापिका विद्या चेंडके यांनी आभार मानले. यावेळी नंदिनी नायकवडी, जिल्हा परिषद सदस्या प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, स्नेहल नायकवडी, किरण नायकवडी, गौरव नायकवडी, भगवान पाटील, बाबूराव बोरगांवकर, दिनकर बाबर, प्रा आनंदराव शिंदे, अजित वाजे, अभियंता वसंत वाजे, संभाजी थोरात, विश्वास मुळीक, नंदू पाटील, सावकर कदम उपस्थित होते.