कडेगावात वाळू तस्करीमागे लागेबांधे

By Admin | Published: April 25, 2017 11:03 PM2017-04-25T23:03:55+5:302017-04-25T23:03:55+5:30

प्रशासनाकडून जुजबी कारवाई : महसूल विभागाचा कानाडोळा, तालुक्यात संतापाची लाट

Laagbondhe behind sand trafficking in Kagawa | कडेगावात वाळू तस्करीमागे लागेबांधे

कडेगावात वाळू तस्करीमागे लागेबांधे

googlenewsNext



कडेगाव : कडेगाव तालुक्यातील येरळा नदीतून कोट्यवधीच्या वाळूची चोरी होत असताना, महसूल प्रशासन जुजबी कारवाई करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत आहे. वाळू माफियांशी असलेल्या महसूल प्रशासनाच्या लागेबांध्यांची जोरदार चर्चा नागरिकांतून सुरू आहे.
वांगी, नेवरी, वडियेरायबाग, कान्हरवाडी, शिवणी, शेळकबाव येथील येरळा नदीपात्रात बेसुमार वाळू उपसा होत आहे. महसूलचे अधिकारी, कर्मचारी, मंडल अधिकारी, तलाठी हे केवळ जुजबी कारवाई करून वाळू तस्करांना पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
गेल्या काही दिवसात येरळा नदीपात्रातून लाखो रूपयांची वाळू चोरीस गेली. त्यामुळे वाळूपासून शासनाला मिळणारा महसूल तर बुडाला आहेच, शिवाय नदीपात्रात जागोजागी विहिरीपेक्षाही मोठे खड्डे पडले आहेत. याला जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
रात्रीच्या वेळी नदीपात्रातून वाळू उपसा सुरू असतो. वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या तस्करांशी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे लागेबांधे असल्यामुळे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नदीपात्रातील मोठा वाळूसाठा गायब झाला आहे. काहीवेळा वाळू तस्करांनी ‘डिमांड’ पूर्ण केली नाही तर कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून कारवाईचा फार्स केला जातो. मागील महिन्यात चोरीच्या वाळूची वाहतूक करणारे वाहन न पकडण्यासाठी लाच घेताना एका तलाठ्यास रंगेहात पकडले होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले नाही, तर महसूलच्या या लागेबांध्यांमुळे आताच मुजोर असलेले वाळू तस्कर आणखी शिरजोर होतील. चोरीस गेलेल्या वाळूचा पंचनामा करून संबंधित वाळू तस्करांकडून रक्कम वसूल करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
छोटे मासे गळाला आणि मोठे मासे तळाला
येरळा नदीपात्रात पोकलँड, जेसीबी यंत्राच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असतो. हायवा, डंपर, ट्रक अशा मोठ्या वाहनांतून वाळू वाहतूक करणारे मोठे वाळू तस्कर महसूल विभागाशी ‘हितसंबंध’ जोपासत राजरोसपणे वाळू उपसा व वाहतूक करीत आहेत. ‘डिमांड’ पूर्ण करू न शकणाऱ्या किरकोळ वाळूचोरांवर मात्र महसूलकडून कारवाईचा फार्स करून, यंत्रणा सतर्क असल्याचा आव आणला जात आहे. त्यामुळे छोटे मासे गळाला आणि मोठे मात्र तळाला, अशी अवस्था झाली आहे.
तहसीलदारांना गाडी नाही
कडेगावच्या तहसीलदार अचर्ना शेटे या वाळू तस्करांना चाप लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काही वाळू वाहतूक करणारी वाहने त्यांनी पकडली आहेत .परंतु त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा पडत आहेत .त्यांना शासनाची गाडी नाही, त्यामुळे रात्रीच्यावेळी भाड्याची गाडी घेऊन कारवाईसाठी धावपळ करावी लागत आहे.

Web Title: Laagbondhe behind sand trafficking in Kagawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.