कामगार विमा महामंडळास खासगी डॉक्टरांकडून ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:44 AM2019-08-20T00:44:08+5:302019-08-20T00:45:18+5:30
महापालिका क्षेत्रासह लगतच्या भागातील सेवा बंद केलेल्यांसह नवीन वैद्यकीय व्यावसायिकांनी या सेवेकडे पाठ फिरविली असल्याने महापालिका आणि लगतच्या औद्योगिक कामगारांना चांगली सेवा मिळणे आता कठीण होणार आहे़
महालिंग सलगर ।
कुपवाड : महापालिका क्षेत्रालगतच्या औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना चांगल्या रुग्णालयाची सोय व्हावी, या उद्देशाने खासगी रुग्णालयांना राज्य कामगार विमा महामंडळाकडून (इएसआयसी) नुकतेच आवाहन करण्यात आले होते़. मात्र थकीत बिले, इएसआयसीच्या कर्मचाऱ्यांकडून मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडून नकारघंटा मिळाली आहे.
महापालिका क्षेत्रासह लगतच्या भागातील सेवा बंद केलेल्यांसह नवीन वैद्यकीय व्यावसायिकांनी या सेवेकडे पाठ फिरविली असल्याने महापालिका आणि लगतच्या औद्योगिक कामगारांना चांगली सेवा मिळणे आता कठीण होणार आहे़ या रुग्णालयाचा कामगारांचा चांगला उपयोग होतो. मात्र, प्रशासनाच्या कुचकामी कारभारामुळे खासगी क्षेत्रातील डॉक्टरांची या रुग्णालयाकडील ओढ कमी झाली आहे.
जिल्ह्यात एमआयडीसी, सहकारी औद्योगिक वसाहती, ग्रामीण भागातील विविध उद्योग आणि खासगी क्षेत्रातील सुमारे वीस लाख कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांची नोंदणी राज्य कामगार विमा महामंडळाकडे (इएसआयसी) आहे़ याबदल्यात हे नोंदणीकृत कामगार आणि कुटुंबीयांना इएसआयसीकडून चांगली वैद्यकीय सेवा पुरविण्याची तरतूद कायद्यात आहे़
इएसआयसीला सध्या नवीन तरतुदीनुसार व्यवस्थापन आणि कामगारांनी मिळून चार टक्के रक्कम भरणा करण्याची सक्ती केली आहे़. व्यवस्थापनाने एक दिवस जरी हा विम्याचा भरणा करण्यास दिरंगाई केली तरी त्वरित कारवाई होते.
मात्र, विम्याच्या रकमेचा भरणा करूनही कामगारांना म्हणाव्या तशा सुविधा मिळत नाहीत. इएसआयसीने गाजावाजा करत सांगली आणि कुपवाडमध्ये सुरू केलेल्या अकरा रुग्णालयांना त्यांची थकीत बिले न मिळाल्याने त्यांनी कामगारांची सेवा बंद केली आहे़, तसेच मर्जीतील काही ठराविक सुरू असलेल्या रुग्णालयांतून कामगारांना सेवा मिळण्याऐवजी अपमानच पदरी पडत आहे, असा आरोप होत आहे. सध्याच्या कालखंडात कामगारांना या सेवेचा चांगला फायदा होणे गरजेचे असताना त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.
या पार्श्वभूमीवर सेवा बंद केलेल्या आणि नव्याने सहभागी होऊ इच्छिणाऱ्या रुग्णालयांसाठी इएसआयसीकडून जाहिरातीद्वारे आवाहन करण्यात आले होते. मात्र, थकीत बिले आणि अपमानास्पद वागणुकीला कंटाळलेल्या खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडून या आवाहनास अतिशय कमी प्रतिसाद मिळाला आहे. इएसआयसीची सेवा नाकारलेल्या अकरा व्यावसायिकांनी या जाहिरातीची दखलच घेतली नाही़. नव्यांनीही पाठ फिरविली आहे़ हा चिंतेचा विषय बनला आहे.
‘इएसआयसी’चा : जावईशोध
राज्य कामगार विमा महामंडळाने नवा जावईशोध लावला असून, यामध्ये महिन्याचा कालावधी गृहीत धरून जुना आणि नवा अशी अन्यायी वर्गवारी केली गेली आहे. त्यामुळे नवीन आयटीआय पूर्ण केलेली मुले आणि नव्याने काम करणारा होतकरू गरीब कामगार यांना मल्टिस्पेशालिटीच्या सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे़ ही वर्गवारी त्वरित बंद करून समान सुविधा मिळाव्यात, अशी मागणी होत आहे.