अरे देवा! देशाला २०४७ मध्ये स्वातंत्र्य मिळालं; मंत्री सुरेश खाडे यांचं पहिलंच भाषण वादात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 12:04 PM2022-08-18T12:04:29+5:302022-08-18T12:04:59+5:30
खाडे यांनी स्वातंत्र्यदिनी त्यांचे देशाबाबतचे अज्ञान दाखवले
सांगली : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव असताना त्याचा रौप्य महोत्सव म्हणून उल्लेख तसेच देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले असताना २०४७ चा उल्लेख करून कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी स्वातंत्र्य दिनाचा एकप्रकारे अवमान केला आहे. त्यांनी याबाबत जनतेची माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
होनमोरे म्हणाले, खाडे यांनी स्वातंत्र्यदिनी त्यांचे देशाबाबतचे अज्ञान दाखवले. मंत्री असणाऱ्या व्यक्तीने भान ठेवून जबाबदारीने, अभ्यास करून बोलणे अपेक्षित आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमामध्ये ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमामध्ये सुरेश खाडे यांनी भाषण केले. यावेळी ते भान हरपल्यासारखे बोलले. त्यांच्या या वक्तव्यातून अज्ञानपणा दिसून आला.
अमृत महोत्सवी वर्षाऐवजी रौप्य महोत्सवी वर्ष असा उल्लेख केला तसेच १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले असताना २०४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्याचे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या त्यांच्या चुकीच्या वक्तव्यातून जिल्ह्याची व तालुक्याची बदनामी झाली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात खाडे कोणत्या भ्रमात बोलत होते, ते त्यांनाच माहीत असेल. भविष्यात मंत्रिपदाच्या खुर्चीचे भान ठेवूनच त्यांनी वक्तव्ये करावीत.
तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व, पण विकासाकडे दुर्लक्ष
मिरज विधानसभा मतदारसंघाचे ते तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करीत आहेत, परंतु शहराच्या विकासाकडे त्यांचे लक्ष नाही. मिरज शहर पूर्वीप्रमाणेच बकाल राहिलेले आहे. खाडे यांनी प्रदीर्घ आमदारकी भोगूनही मतदारसंघ मतदारसंघातील रस्त्यांचे प्रश्न तरी वंचित राहिला आहे. त्यांनी किमान मार्गी लावावेत. त्यांना रस्त्याच्या तसेच अन्य प्रश्नांबाबतही अजिबात गांभीर्य नाही. देशाच्या इतिहासाबाबत ज्यांना काही माहिती नाही, त्यांना अन्य गोष्टीचे भान कसे राहणार, असा सवालही होनमोरे यांनी केला.