ते मजूर अखेर बसने गावाकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 07:40 PM2020-05-22T19:40:04+5:302020-05-22T19:44:11+5:30
उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार अशा राज्यातून मजुरीसाठी आलेल्या मजुरांची संख्या जास्त असल्याने त्यांना त्यांच्या राज्यातून जाण्यासाठी ट्रेन ची व्यवस्था झाली. परंतु छत्तीसगड मधून आलेल्या मजुरांची संख्या कमी असल्याने त्यांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी ट्रेन नाही. या मजुरांना घेऊन आलेले ठेकेदार यापूर्वीच निघून गेले.
सांगली : छत्तीसगड येथील मजूर तीन ते चार आठवड्यापासून सर्व कार्यालयात हेलपाटे मारत होते. परंतु गावाकडे कसे जायचे याचा मार्गच सापडत नसल्याने शेवटी सांगलीमधून त्यांच्या गावी चालत निघाले होते. त्याबाबत सांगली जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष अॅड. अमित शिंदे यांना माहिती समजल्यानंतर त्यांनी या मजुरांची समजूत काढून त्यांना थांबायला सांगितले. चार दिवस सुधार समितीच्या टीम ने त्या सर्व मजुरांच्या कागदपत्रांची पूर्तता करून अखेर ११३ मजुरांना त्यांच्या परिवारासह एस टी महामंडळाच्या बसने गावाकडे काल रवाना केले.
उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार अशा राज्यातून मजुरीसाठी आलेल्या मजुरांची संख्या जास्त असल्याने त्यांना त्यांच्या राज्यातून जाण्यासाठी ट्रेन ची व्यवस्था झाली. परंतु छत्तीसगड मधून आलेल्या मजुरांची संख्या कमी असल्याने त्यांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी ट्रेन नाही. या मजुरांना घेऊन आलेले ठेकेदार यापूर्वीच निघून गेले. ज्या ठिकाणी काम करत होते तेथे कसेबसे दोन महिने काढले. जेवणाची सोय होईना, ठेकेदार निघून गेल्याने कामाला कोठे जायचे हे समजेना. त्यात गावी असणाऱ्या घरच्यांनी लवकर परत या म्हणून सारखे निरोप द्यायला सुरुवात केली. परंतु गावी जायचे कसे हे त्यांना समजत नव्हते. त्यामुळे अखेर त्यांनी चालत गावी जाण्याचा निर्णय घेतला.
त्याची माहिती मिळाल्यानंतर अॅड. अमित शिंदे यांनी त्यांची समजूत काढत त्यांना बसने जाण्याची व्यवस्था करतो असे सांगितले. शिंदे यांना या मजुरांना एस टी ने गोंदिया जिल्ह्यापर्यंत छत्तीसगडसीमेपर्यंत सोडता येऊ शकते व तेथून छत्तीसगड शासन या मजूरांना त्यांच्या गावी पोहचवू शकते हे समजले.त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय व एस टी महामंडळाकडे संपर्क साधला.
तिथे व्यवस्थित माहिती मिळत नसल्याने त्यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना याची माहिती दिली व त्यांनतर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी भेट घेतली. त्यांनी तहसीलदार यांना सूचना करून त्यांची जाण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. सुधार समितीचे कार्यकर्ते तहसील कार्यलय सांगेल त्या कागदपत्रांची पूर्तता करत होते. परंतु जिल्हाधिकारी यांनी सांगून देखील दोन दिवस तहसीलदार कार्यालयात कोणी व्यवस्थित दखल घेत नव्हते. त्यामुळे अखेर तहसील कार्यालयात सर्वांना धारेवर धरून त्यांच्या कामाबद्दल जाब विचारल्यानंतर व मजुरांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर सूत्रे हलली व मजुरांना गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
काल या ११३ मजुर व त्यांच्या लहान मुलांना घेऊन चार एस टी गोंदीयकडे रवाना झाल्या.त्या मजुरांनी जाताना समाधान व्यक्त करत सुधार समितीच्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला. सुधार समितीचे प्रशांत साळुंखे, अॅड. अरुणा शिंदे, महालिंग हेगडे, रोहित शिंदे, नितीन मोरे, निलेश मोरे, सुधिर भोसले, नितीन शिंदे, रविंद्र काळोखे, जयंत जाधव, सद्दाम खाटीक हे यासाठी चार दिवस झटत होते.
या मजुरांच्या राहण्याची सोय मालू हायस्कूल येथे करण्यात आली होती. हॉटेल व्यावसायिक प्रविण शेट्टी यांनी देखील या मजुरांची जेवणाची सोय केली. प्रा.आर. बी. शिंदे यांनी सर्वांना वाटेत जाण्यासाठी पाण्याची सोय केली. हितेश ओंकार यांच्यामुळे कमी वेळेत सर्वांना पाणी उपलब्ध झाले. मिरज आगार व सांगली आगार च्या एस टी कर्मचाऱ्यांनी मदत केली.