लाखाच्या खंडणीसाठी मिरजेत परप्रांतीय मजुराचे अपहरण, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 01:23 PM2023-12-27T13:23:21+5:302023-12-27T13:23:56+5:30

अल्पवयीन संशयित फरार

laborer kidnapped in Miraj for extortion of lakhs, three arrested | लाखाच्या खंडणीसाठी मिरजेत परप्रांतीय मजुराचे अपहरण, तिघांना अटक

लाखाच्या खंडणीसाठी मिरजेत परप्रांतीय मजुराचे अपहरण, तिघांना अटक

मिरज : एक लाखाच्या खंडणीसाठी मिरजेत परप्रांतीय मजुराचे अपहरण करून चाकू व लोखंडी गजाने बेदम मारहाण करण्यात आली. अपहरण झालेल्या जीतबंधन पासवान (मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. सलगरे, ता. मिरज) याची पोलिसांनी सुटका केली.

याप्रकरणी पोलिसांनी संजू ऊर्फ खुदबुद्दीन शेखर कांबळे (वय २८, रा. प्रतापनगर झोपडपट्टी, मिरज), शहजाद सलीम शेख (वय २०, रा. कुपवाड) व साईनाथ गोविंद कांबळे (वय २२, रा. मिरज रेल्वेस्टेशनजवळ, मिरज) या तिघांना अटक केली असून, त्यांचा अल्पवयीन साथीदार फरारी आहे.

उत्तर प्रदेशातील जीतबंधन पासवान हा पाइपलाइनचे काम करणारा मजूर असून, तो सध्या सलगरे (ता. मिरज) येथे वास्तव्यास आहे. तो २५ डिसेंबर रोजी मिरज ग्रामीण बसस्थानकाजवळ सलगरे येथे जाण्यासाठी आला होता. त्यावेळी संजू कांबळे व त्याचे साथीदार त्याच्याजवळ आले. त्यांनी तुला सलगरेत सोडतो, असे सांगून जबरदस्तीने दुचाकीवर बसवून कुपवाड परिसरात निर्जनस्थळी नेऊन चाकू, लोखंडी गज व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्याच्याकडील दोन हजार रुपये व मोबाइल काढून घेतला. त्यानंतर जीतबंधन याचा मित्र अशोक पासवान यास फोन करून जीतबंधनला जिवंत सोडायचे असेल तर एक लाख रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली. यामुळे घाबरलेल्या अशोक पासवान याने तातडीने गांधी चौक पोलिसांना माहिती दिली.

पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या नेतृत्वाखाली पथक जीतबंधनच्या शोधासाठी रवाना झाले. खंडणीसाठी आलेल्या मोबाइल क्रमांकाचे लोकेशन तपासले असता, सर्वजण मिरजेत डॉ. आंबेडकर उद्यानाजवळ असल्याचे स्पष्ट आले. पोलिसांनी छापा टाकून जीतबंधनची सुटका केली. त्याला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालय दाखल केले.

अटकेतील सर्व सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, मारामारी, खंडणी आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यात सहभागी असणारा एक अल्पवयीन फरारी असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपहरणकर्ते नशेच्या आहारी

मजुराचे अपहरण करणारे सर्व आरोपी अमली पदार्थाचे व्यसनी आहेत. त्यांनी मोठा व्यावसायिक असल्याचे समजून पासवान याचे अपहरण केले. नशेत त्यास बेदम मारहाण केली. पोलिसांनी तातडीने शोध घेत सुटका केल्याने पासवान बचावला.

Web Title: laborer kidnapped in Miraj for extortion of lakhs, three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.