आळसंद येथे ३० तोळे सोन्याचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:13 AM2018-10-22T00:13:03+5:302018-10-22T00:13:09+5:30
विटा : आळसंद (ता. खानापूर) येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण पांडुरंग कुंभार यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख ...
विटा : आळसंद (ता. खानापूर) येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण पांडुरंग कुंभार यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख २० हजार रूपयांसह सुमारे २५ ते ३० तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत विटा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.
आळसंद येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण (तात्या) कुंभार हे मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. सध्या ते सेवानिवृत्त झाले असून, ते पत्नीसह आळसंद येथील लिंगेश्वर मठाशेजारी वास्तव्यास होते. रविवारी कुंभार व त्यांची पत्नी घराला कुलूप लावून परगावी कामानिमित्त गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी भरदुपारी कुंभार यांच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी लोखंडी कपाटाचे कुलूप कटावणीने तोडून रोख २० हजार रूपयांसह सुमारे २५ ते ३० तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.
कुंभार यांच्या पत्नी लीला लक्ष्मण कुंभार या आळसंद येथे आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी विटा येथे थांबलेले पती लक्ष्मण कुंभार यांना माहिती दिली. यावेळी कुंभार घरी आल्यानंतर त्यांनी पाहणी केली असता चोरट्यांनी रोख २० हजार रूपयांसह सुमारे बाजार भावाप्रमाणे ८ लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे निदर्शनास आले. यावेळी चोरट्यांनी वापरलेली कटावणी व अन्य साहित्य तिथेच खोलीत टाकून गेल्याचे दिसून आले.
आळसंद येथे भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कुंभार यांच्या घरी गेल्या सहा माहिन्यांपूर्वीही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला होता. परंतु शेजाऱ्यांमुळे हा प्रयत्न अयशस्वी झाला होता. रविवारी चोरट्यांनी घरी कुणी नसल्याचे बघून सुमारे ८ लाख रूपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला. याप्रकरणी विटा पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.