बालगंधर्व पुरस्कार वितरण सोहळ्यात सातत्याचा अभाव
By admin | Published: November 9, 2014 10:55 PM2014-11-09T22:55:09+5:302014-11-09T23:27:14+5:30
नाट्यरसिकांमध्ये नाराजी : निधी मिळूनही स्मारकाचे काम प्रलंबित
शरद जाधव - भिलवडी -नागठाणे, ता. पलूस येथील बालगंधर्व स्मारक समितीच्यावतीने प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या नटसम्राट नाट्यरसिकांमध्ये नाराजी : निधी मिळूनही स्मारकाचे काम प्रलंबितबालगंधर्व पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सातत्याचा अभाव निर्माण झाला आहे. नागठाणे हे संगीतसूर्य नटसम्राट बालगंधर्वांचे जन्मगाव आहे. महाराष्ट्राच्या संगीत व नाट्यक्षेत्रामध्ये प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कार वितरणाची परंपरा गेल्या तीन वर्षांपासून खंडित झाल्याने नाट्यरसिक व ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
नटसम्राट बालगंधर्वांची कर्मभूमी म्हणून पुणे सर्वपरिचित आहे. मात्र नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्वांची जन्मभूमी नागठाणे गाव तसे उपेक्षितच होते. त्यांचे बालपण व प्राथमिक शिक्षणही येथेच झाले. बालगंधर्वांनी ग्रामदैवत नागेश्वर मंदिराचा जीर्णोध्दारही के ला आहे. राजू कुलकर्णी या ध्येयवेड्यासह गावातील तरुणांनी बालगंधर्व स्मारक समितीची स्थापना केली. विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागठाणे गाव बालगंधर्वांची जन्मभूमी असल्याची नव्याने ओळख निर्माण केली. यामधूनच २००० पासून बालगंधर्व पुरस्कार वितरण सोहळा सुरू करण्यात आला.
नाट्यअभिनय किंवा संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यात येऊ लागला. प्रभाकर पणशीकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर, डॉ. श्रीराम लागू, यशवंत देव, चंद्रकांत गोखले, जगदीश खेबूडकर, दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी, सुरेश वाडकर या मान्यवरांना बालगंधर्व पुरस्कार प्रदान करण््यात आला. युवा बालगंधर्व पुरस्कार मकरंद अनासपुरे, अमृता सुभाष, पंढरीनाथ कांबळे, सिध्दार्थ जाधव, कविता लाड, भरत जाधव, अजय-अतुल यांना प्रदान करण्यात आला. बालगंधर्व पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख रक्कम, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे, तर युवा बालगंधर्व पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे.
शासनाने गठित केलेल्या बालगंधर्व स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. पतंगराव कदम व सचिव सांगलीचे जिल्हाधिकारी आहेत. गावपातळीवरील बालगंधर्व स्मारक समितीचे अध्यक्ष, महाराष्ट्र युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, तर कार्याध्यक्ष शहाजी कापसे आहेत.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांंपासून सिनेअभिनेते अनुपम खेर आदींसारखे कित्येक मान्यवर पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने नागठाणे या बालगंधर्वांच्या जन्मभूमीमध्ये येऊन गेले. या पुरस्कार सोहळ्यामुळे आणि डॉ. पतंगराव कदम यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांची दखल घेत शासनाने स्मारकास ३ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. कृष्णा नदीकाठावर स्मारकाचे बांधकाम सुरू झाले. पायाभरणीच्या वर आलेले बांधकाम गेल्या काही महिन्यांपासून रखडले आहे.
पुरस्कार वितरणाची गेल्या तीन वर्षांपासून खंडित झालेली परंपरा डॉ. पतंगराव कदम व डॉ. विश्वजित कदम यांनी लक्ष घालून पूर्ववत सुरू ठेवावी, अशी मागणी नाट्यरसिक व ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.
निधी चारा छावण्यांसाठी वर्ग
बालगंधर्व पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख रक्कम, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे, तर युवा बालगंधर्व पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. २०११ मध्ये दुष्काळामुळे पुरस्कार वितरणाचा निधी दुष्काळग्रस्त चारा छावण्यांना मदत निधीसाठी दिला, तर लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते पतंगराव कदम व त्यांचा परिवार व्यस्त असल्याने पुरस्कार वितरण सोहळा लांबणीवर पडल्याची चर्चा आहे.