काँग्रेसला सतावतेय अनुभवी नेत्यांची उणीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 11:16 PM2019-07-07T23:16:52+5:302019-07-07T23:16:57+5:30
अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कधीकाळी दिग्गज, अनुभवी नेत्यांचा भरणा असलेल्या काँग्रेस-राष्टÑवादीला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनुभवी, ...
अविनाश कोळी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कधीकाळी दिग्गज, अनुभवी नेत्यांचा भरणा असलेल्या काँग्रेस-राष्टÑवादीला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनुभवी, ज्येष्ठ नेत्यांची उणीव भासणार आहे. काँग्रेसची बहुतांश मतदारसंघातील सूत्रे दुसऱ्या फळीच्या हाती गेली असून, राष्टÑवादीची अवस्थाही फारशी वेगळी नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत या दुसºया फळीतील नेत्यांचे कौशल्य व ताकद पणाला लागणार आहे.
सांगली जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांच्या काळात अनेक दिग्गज नेत्यांचे निधन झाले. त्यामुळे एक मोठी पोकळी आघाडीत निर्माण झाली आहे. माजी मंत्री पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख, आर. आर. पाटील, मदन पाटील, माजी आमदार हाफिज धत्तुरे, विलासराव शिंदे, इलियास नायकवडी अशा दिग्गज नेत्यांचे निधन आघाडीला धक्का देऊन गेले. अचानक इतकी मोठी पोकळी निर्माण झाल्याने आघाडीत चिंतेचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीतही हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र या राजकीय पोकळीची सर्वाधिक चिंता विधानसभा निवडणुकीत सतावणार आहे. राष्टÑवादीतून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसमधून माजी आमदार सदाशिवराव पाटील हे दोनच ज्येष्ठ नेते सध्या आघाडीत आहेत. तरीही दोन्ही नेत्यांना त्यांच्या मतदारसंघातच अडकविण्याची खेळी भाजपकडून खेळली जाणार असल्याने, अन्य मतदारसंघात दुसºया फळीच्या ताकदीची परीक्षा होणार आहे.
सहा वर्षापूर्वी राष्टÑवादीतून अनेक दिग्गज नेते भाजप व शिवसेनेत गेले. यामध्ये खासदार संजयकाका पाटील, आ. विलासराव जगताप, आ. अनिल बाबर, पृथ्वीराज देशमुख, अजितराव घोरपडे, दिनकर पाटील आदी नेत्यांचा समावेश आहे. दिग्गज नेत्यांची फळी अन्य पक्षात गेल्यानंतर राष्टÑवादीला मोठा दणका बसला. काँग्रेसपाठोपाठ त्यांंच्या ताकदीचा आलेखही अचानक खाली आला. त्यातही पक्षाच्या अस्तित्वाची धडपड उर्वरित नेत्यांकडून सुरू होती, मात्र दिग्गज नेत्यांच्या निधनाने पुन्हा धक्के बसत राहिले. जिल्ह्यातील सध्याची काँग्रेस-आघाडीची ताकद फार मोठी नाही. भाजपने काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यातील आठपैकी चार, तर शिवसेनेने एक विधानसभा मतदारसंघ हस्तगत केला. तासगाव-कवठेमहांकाळ, वाळवा आणि पलूस-कडेगाव हे तीनच मतदारसंघ आघाडीने राखले. यंदा हे मतदारसंघही खेचण्याची जोरदार तयारी भाजपने केली आहे. आघाडीत अनुभवी, ज्येष्ठ नेत्यांची उणीव तीव्र होत असतानाच, भाजपकडे ज्येष्ठ, अनुभवी नेत्यांची ताकद वाढत आहे. त्यामुळे आघाडी आणि युती यांच्या ताकदीमधील अंतर मोठे होत आहे.
या नेत्यांकडे राहणार लक्ष...
शिराळ्यात शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित देशमुख, सांगलीत मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील, वसंतदादांचे नातू विशाल पाटील, तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात आर. आर. पाटील यांच्या पत्नी आ. सुमनताई पाटील, त्यांचे पुत्र रोहित पाटील, पलूस-कडेगावमध्ये पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम या दुसºया फळीतील नेत्यांकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे. त्यांच्या राजकीय कौशल्याची तसेच ताकदीची परीक्षा घेणारी ही निवडणूक आहे.
भाजपच्या वाढत्या ताकदीची आघाडीस चिंता
जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत भाजपने सर्व महत्त्वाच्या संस्था ताब्यात घेऊन आघाडीला कमकुवत केले असताना, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी आघाडीचे उरले-सुरले अस्तित्व संपुष्टात आणण्याची रणनीती आखली आहे. आघााडीकडे असलेल्या तीन जागा तरी ताकदीने लढविण्याबाबत आघाडी प्रयत्नशील असली तरी, अन्य मतदारसंघात त्यांच्या लढतीचे भवितव्य दुसºया फळीवर अवलंबून आहे.