ऑनलाईन शिक्षणाला आधार शिक्षकांच्या मोबाईलचाच, सर्रास शाळांत इंटरनेट जोडणीचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:18 AM2021-07-10T04:18:46+5:302021-07-10T04:18:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लॉकडाऊन काळात ऑनलाईन शिक्षणाचा गवगवा जोरात असला तरी दोन हजारहून अधिक शाळांत अधिकृत इंटरनेट ...

Lack of internet connection in schools is the mainstay of online education | ऑनलाईन शिक्षणाला आधार शिक्षकांच्या मोबाईलचाच, सर्रास शाळांत इंटरनेट जोडणीचा अभाव

ऑनलाईन शिक्षणाला आधार शिक्षकांच्या मोबाईलचाच, सर्रास शाळांत इंटरनेट जोडणीचा अभाव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : लॉकडाऊन काळात ऑनलाईन शिक्षणाचा गवगवा जोरात असला तरी दोन हजारहून अधिक शाळांत अधिकृत इंटरनेट कनेक्शनच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षक वर्ग स्वत:च्या मोबाईलवरुन इंटरनेट घेऊन शिक्षणाचा प्रवाह अखंडित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

गेल्या दीड वर्षांपासून सर्वच शाळा ऑनलाईन झाल्या आहेत. विद्यार्थी घरात आणि शिक्षक वर्गात अशी स्थिती आहे. यावर मार्ग काढताना ऑनलाईन शिक्षण जोरात सुरु झाले. यातील अडथळे मात्र नजरेआड करण्यात आले. ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोनच नाहीत असे सर्वेक्षणात आढळले. तशीच स्थिती शाळांचीही होती. जिल्ह्यात १६८८ प्राथमिक शाळा आहेत, त्यापैकी एकाही शाळेत अधिकृत इंटरनेट जोडणी नाही. माध्यमिक शाळांपैकी ६० टक्के शाळांतच सुविधा आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षकांना स्वत:च्या मोबाईलवर अवलंबून राहावे लागत आहे.

कोट

ऑनलाईन अभ्यासात मोबाईल नेटवर्कचे अडथळे

घरात एकच मोबाईल आहे. वडील कामावरुन परततात तेव्हा थोडाफार अभ्यास होतो. दिवसभर मित्राकडे जाऊन अभ्यास करतो. गावात मोबाईलला रेंज कमी असल्यानेही अभ्यास चांगला होत नाही. शाळा सुरु कधी होणार याची वाट पाहत आहे.

- हर्ष कवलापुरे, विद्यार्थी, खटाव

सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत मोबाईलवर क्लास असतो. अकरापासून शाळेचे तास सुरु होतात. सरांनी शिकवलेले समजते, पण शंका विचारता येत नाहीत. मोबाईलवर अभ्यास कंटाळवाणा आहे. प्रत्यक्ष शाळेत गेल्यावर राहिलेला अभ्यास पूर्ण करणार आहे.

- कीर्ती व्हनमाने, विद्यार्थिनी, शिंदेवाडी

कोट

इंटरनेट कनेक्शन नसले तरी शिक्षणात खंड नाही

शाळेत इंटरनेट जोडणी नसली तरी ऑनलाईन शिक्षणात खंड पडू दिलेला नाही. मोबाईलवरुन विद्यार्थ्यांशी संपर्क कायम ठेवला आहे.

- परशुराम शिंदे, शिक्षक

मोबाईलवरुन इंटरनेट चांगल्या स्पीडने मिळते, त्यामुळे वेगळ्या कनेक्शनची गरज नाही. गेल्या वर्षभरात मोबाईलवरच विनाअडथळा शिक्षण सुरु ठेवले आहे.

- परशुराम जाधव, शिक्षक

शिक्षणाधिकारी म्हणतात,

इंटरनेट कनेक्शन नाही म्हणून कोणत्याही शाळेत शिक्षणात खंड पडलेला नाही. शिक्षकांनी मोबाईलवरुन ज्ञानदान सुरु ठेवले आहे. गेल्या वर्षभरात अत्यंत उत्तम पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद कायम राखला आहे.

- विष्णू कांबळे, शिक्षणाधिकारी.

पॉईंटर्स

जिल्ह्यातील एकूण शाळा २,७७७ (इंटरनेट नसलेल्या २,३१८, इंटरनेट असलेल्या ४५९)

जिल्ह्यातील शासकीय शाळा १,७१८ (इंटरनेट नसलेल्या १,७१८, इंटरनेट असलेल्या ०)

जिल्ह्यातील अनुदानित शाळा ७६४ (इंटरनेट नसलेल्या ३३५, इंटरनेट असलेल्या ४२९)

विनाअनुदानित शाळा २९५ (इंटरनेट नसलेल्या २६५, इंटरनेट असलेल्या ३०)

Web Title: Lack of internet connection in schools is the mainstay of online education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.