महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूटमार, सिग्नल यंत्रणेत बिघाड केल्याचे निष्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 05:42 AM2017-10-27T05:42:13+5:302017-10-27T05:42:51+5:30
मिरज (जि. सांगली) : सिग्नल यंत्रणेत बिघाड करून मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस जेजुरीजवळ अडवून चोरट्यांनी चार प्रवाशांचा दोन लाखांचा ऐवज लुटला.
मिरज (जि. सांगली) : सिग्नल यंत्रणेत बिघाड करून मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस जेजुरीजवळ अडवून चोरट्यांनी चार प्रवाशांचा दोन लाखांचा ऐवज लुटला. गुरुवारी मध्यरात्री झालेल्या या लूटमारीबाबत मिरज रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
चोरट्यांनी सिग्नल यंत्रणेत बिघाड करुन ठेवला असल्याने सिग्नल मिळाला नाही, त्यामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेस राजेवाडी स्थानकावर थांबविण्यात आली. गाडी अचानक थांबल्याने प्रवाशांनी खिडक्या उघडून बाहेर डोकावण्यास सुरुवात केली. यावेळी अंधारात दबा धरून बसलेल्या चोरट्यांच्या आठ ते दहा जणांच्या टोळीने महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पलायन केले.
लूटमारीनंतर रेल्वेत मोठा गोंधळ सुरू झाला. रेल्वे परत सुरू झाल्यानंतर संतप्त प्रवाशांनी साखळी ओढून रेल्वे थांबविली. मात्र प्रवाशांची तक्रार घेण्यासाठी पोलीस उपलब्ध नसल्याने प्रवाशांनी पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. गाडी मिरजेत व कोल्हापुरात आल्यानंतर चार प्रवाशांनी रेल्वे पोलिसांत चोरीची तक्रार दिली. चोरट्यांच्या टोळीने आणखी काही प्रवाशांचे दागिने लुटल्याचाही अंदाज आहे.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे़ प्रवाशी असुरक्षित असल्याची प्रतिक्रिया सर्वस्तरातून उमटत आहे़ आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी होत आहे़
।भोईवाडा, वांद्रे व डोंबिवलीतील प्रवाशांना लुटले
एस-३ बोगीतील कृष्णा श्रीकांत माने (वय १७, रा. भोईवाडा, मुंबई) यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीची दीड तोळे सोन्याची चेन, एस-५ बोगीतील सुचित्रा प्रल्हाद विटेकरी (३४, रा. निपाणी रोड, चिकोडी) यांच्या गळ्यातील ४५ हजार किमतीचे दीड तोळे सोन्याचे मंगळसूत्र, एस-८ बोगीतील विजया केतन राजगुरू (४५, रा, डोंबिवली) यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे मंगळसूत्र, एस-१ बोगीतील नूरजहॉँ सैफुद्दीन शेख (५०, रा. वांद्रे, मुंबई) यांच्या गळ्यातील ४५ हजारांचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी खिडकीतून खेचून नेले.