एजंटांचा लाभार्थ्यांना लाखोचा गंडा

By admin | Published: June 16, 2015 11:02 PM2015-06-16T23:02:24+5:302015-06-17T00:41:06+5:30

मिरज तालुक्यातील प्रकार : मनरेगा कामांच्या मंजुरीसाठी हेलपाटे

Lakhs of agents to the agent's beneficiaries | एजंटांचा लाभार्थ्यांना लाखोचा गंडा

एजंटांचा लाभार्थ्यांना लाखोचा गंडा

Next

मिरज : मिरज तालुक्यात मनरेगातंर्गत गोठा बांधकाम व विहीर खुदाई कामांच्या वाढत्या मागणीमुळे मिरज पंचायत समितीकडे मोठ्याप्रमाणात प्रस्ताव प्रलंबित आहेत. मंजुरीस विलंब होत असल्याचा गैरफायदा एजंटांनी घेण्यास सुरुवात केली आहे. एजंटांनी प्रस्तावांना मंजुरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनेक लाभार्थ्यांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याच्या तक्रारी आहेत. योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी फसवणुकीचा उद्योग करणाऱ्या एजंटांच्या कारनाम्यामुळे लाभार्थी पंचायत समितीत हेलपाटे घालत असल्याचे चित्र आहे. फसवणूक करणाऱ्या एजंटांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
गोठा बांधकामाला ७० हजार रुपये व विहीर खुदाईला सुमारे ३ लाख अनुदान आहे. एजंटांनी अनुदानाच्या तुलनेत लाभार्थ्यांकडून गोठ्यासाठी ५ ते १५ व विहीर प्रस्तावांना मंजुरीसाठी ३० ते ४० हजार रुपये घेऊन लाखो रुपयांना गंडा घातल्याच्या तक्रारी आहेत. एजंटांची पंचायत समितीत असलेली उठबस आणि पदाधिकाऱ्यांच्या नावाच्या गैरवापरामुळे लाभार्थी एजंटांच्या बनावाला बळी पडले आहेत. प्रस्तावांच्या मंजुरीसाठी लाभार्थ्यांनी व्याजाने व सोने गहाण ठेवून एजंटांना पैसे दिले आहेत. पैसे देऊनही वर्ष वर्षभर मंजुरी मिळत नसल्याने लाभार्थी पंचायत समितीत येऊन तक्रार करु लागल्याने एजंटांच्या कारनाम्यांचा स्फोट होऊ लागला आहे. एका गावातून एजंटाने पाच लाभार्थ्याकडून प्रत्येकी ५ हजार रुपयाप्रमाणे ५० हजारांवर डल्ला मारला आहे. विहीर मंजुरीसाठीही फसवणुकीचे असे अनेक प्रकार घडले आहेत. तक्रार केल्यास मंजुरी आणि दिलेले पैसे मिळणार नाहीत याच्या भीतीने लाभार्थ्यांची गोची झाली आहे.
फसवणुकीच्या तक्रारी पंचायत समितीपर्यंत येऊनही या गंभीर प्रकाराची दखल घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रोजगार हमीबरोबर विशेष घटक योजनेतही एजंटांनी लाभार्थ्यांची अशाचप्रकारे फसवणूक केल्याची चर्चा आहे. प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी फसवणुकीची दखल घेऊन एजंटांवर कारवाई करावी, अशी लाभार्थ्यांची मागणी आहे. (प्रतिनिधी)

विहीर खुदाईसाठी मागणी
मिरज तालुक्यात रोजगार हमी योजनेतंर्गत गोठा बांधकाम व विहीर खुदाईच्या कामांची मोठी मागणी असल्याने एजंटांनी त्याचा गैरफायदा घेतला आहे. पंचायत समितीत ‘वजन’ असल्याचा बनाव करुन एजंटांनी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची परस्पर फसवणूक केली आहे.

Web Title: Lakhs of agents to the agent's beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.