चांगभलं! आरेवाडीत लाखांवर भाविकांनी घेतले बिरोबाचे दर्शन, पन्नास कोटींची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 03:05 PM2023-03-29T15:05:06+5:302023-03-29T15:05:27+5:30
बिरोबाच्या बनात दर्शनासाठी सकाळपासून रांगा
ढालगाव : ‘बिरुदेव-काशिलिंगाच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या जयघोषात, भंडारा- खोबऱ्याच्या उधळणीत, ढोल- कैताळ-सनईच्या गजरात साडेतीन लाखांवर भक्तांनी मंगळवारी आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबाचे दर्शन घेतले. यात्रेचा मुख्य दिवस असल्याने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गोवा या राज्यांतील भाविकांनी बिरोबाच्या भक्ताला म्हणजेच सूर्याबाला खारा नैवेद्य दाखविला.
बिरोबाच्या बनात दर्शनासाठी सकाळपासून रांगा लागल्या होत्या. भंडारा- खोबऱ्याची उधळण करत, ढोल- कैताळ-सनईच्या गजरात भाविक मंदिराकडे येत होते. दिवसभरात साडेतीन लाखांवर भक्तांनी दर्शन घेतले.
यात्रा कमिटीने भक्तांसाठी दगडी व सिमेंटच्या टाक्या आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्या माध्यमातून दहा टँकर दिल्याने पाण्याची सोय झाली होती. सांगली एसटी आगाराने ६० बसची व्यवस्था केली होती. खासगी प्रवासी वाहनांचा वापरही झाला. शिवाय रेल्वेनेही भाविक आले होते. दुचाकी आणि बैलगाड्यांतून येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त होती.
तीन दिवस चाललेल्या यात्रेत कातडी व्यापारी, मेवामिठाई, हळदी-कुंकू, रसवंतीगृहे, थंड पेये, हॉटेल्स, घोंगडी व्यापारी, किराणा, कलिंगड, करमणूक, नारळ व्यापारी आदींची पन्नास कोटींची उलाढाल झाली.
पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ८० कर्मचाऱ्यांनी भाविकांना रांगेतून दर्शन घेण्यासाठी सहकार्य केले. तहसीलदार बी.जे. गोरे यात्रेवर लक्ष ठेवून होते. महावितरणने अखंडित वीजपुरवठा केला. आरोग्य विभागाने हजारांवर किरकोळ रुग्णांवर उपचार केले. पाणी निर्जंतुकीकरणाकडे या विभागाचे लक्ष होते.
आ. गोपीचंद पडळकर, जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष जयसिंग शेंडगे यांनी भेट दिली. यात्रा समितीचे अध्यक्ष जगन्नाथ कोळेकर, पोलिस पाटील रामचंद्र पाटील, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राहुल कोळेकर, उपाध्यक्ष समाधान कोळेकर, सचिव बाळासाहेब कोळेकर, खजिनदार राजाराम कोळेकर, काशीलिंग कोळेकर, भरमू कोळेकर, ग्रामसेवक आनंद पवार यांनी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
थेट यात्रेतून
- ढालगाव- नागज रस्त्यावर वाहतूक नियोजन करूनही वाहतुकीची कोंडी होत होती.
- यात्रा काळात भाविकांच्या पायाला उन्हाचे चटके बसू नयेत म्हणून मंदिर प्रदक्षिणा मार्गावर मंडप उभारण्यात आला होता.
- आगळगाव, लंगरपेठ, नांगोळे, ढालगाव, ढालेवाडी, इरळी, अलकूडमार्गे बिरोबा बनात येणाऱ्या भाविकांना खड्ड्यांतूनच मार्ग काढावा लागला. कारण दहा वर्षांपासून या रस्त्यांवर डांबरीकरण झालेले नाही. विशेषत: कर्नाटकातून आलेल्या भाविकांना जादा त्रास सहन करावा लागला.