साखर कामगारांचा पगारवाढीने जल्लोष
By admin | Published: June 24, 2016 11:30 PM2016-06-24T23:30:13+5:302016-06-25T01:11:30+5:30
१५ टक्के पगारवाढ : राजारामबापू कारखान्यावर आनंदोत्सव
इस्लामपूर : राज्यातील साखर कामगारांच्या पगारात १५ टक्के वाढ व १२ महिन्यांचा फरक देण्याच्या निर्णयाने राज्यातील साखर कामगारांमध्ये ‘फिलगुड’ वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी त्रिपक्षीय समितीचे सदस्य, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे जनरल सेक्रेटरी शंकरराव भोसले, वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघाचे अध्यक्ष तानाजी खराडे यांनी विशेष परिश्रम घेतले. राजारामबापू साखर कारखान्यातील कामगारांनी साखर वाटून जल्लोष साजरा केला़
३१ मार्च २०१३ ला त्रिपक्षीय समितीची मुदत संपली होती़ मात्र नवी समिती गठित करण्यास बराच विलंब लागला होता़ महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, पुणे, कार्याध्यक्ष अविनाश काका आपटे, अहमदनगर, राऊ पाटील, रावसाहेब भोसले, कोल्हापूर, सुरेश मोहिते, नितीन बेनकर, सोलापूर, युवराज ननवरे, इंदापूर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने मुख्यमंत्री, सहकार मंत्री, कामगार मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला़ अखेर माजी केंद्रीय कृषिमंत्री व साखर उद्योगाचे मार्गदर्शक शरद पवार यांच्या प्रयत्नाने समिती गठित करण्यात आली.
राज्य शासन, साखर संघ व कामगार संघटनेच्या त्रिपक्षीय समितीच्या पुणे येथे ८-९ बैठका झाल्या असून, माजी मंत्री, आमदार जयंत पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पुढाकाराने जानेवारी २०१६ मध्ये अंतरिम रुपये ९०० देण्याचा निर्णय घेण्यात आला़ समितीच्या बैठकांमध्ये पगारवाढ व फरकामध्ये निश्चित निर्णय होत नसल्याने खा़ पवार जो निर्णय देतील तो सर्वांनी मान्य करावा,असा समितीच्या बैठकीत निर्णय घेतला होता़ खा. पवार यांनी सोमवारी पुणे येथे, तर मंगळवारी मुंबई येथे सुमारे ७-८ तास साखर संघ, कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून दोन्ही बाजूमध्ये समन्वय साधून निर्णय दिला आहे़
भोसले म्हणाले, कारखान्यांपुढे उभा असणारे आर्थिक संकट तसेच कामगार व साखर कारखानदारांच्या भूमिका यातून मार्ग निघणे अवघड होते़ मात्र माजी खा. शरद पवार यांनी वेळ देऊन दोन्ही बाजू ऐकून योग्य निर्णय दिला़ साखर कामगार समाधानी आहेत़ हा निर्णय होण्यात राज्य शासन, साखर संघाचेही सकारात्मक सहकार्य मिळाले आहे़ (वार्ताहर)
शरद पवार यांच्या निर्णयाचे स्वागत
शंकर भोसले म्हणाले, अनेक साखर कारखान्यांपुढे उभा असणारे आर्थिक संकट तसेच साखर कामगार व साखर कारखानदारांच्या भूमिका यातून मार्ग निघणे अवघड होते़ मात्र माजी खा. शरद पवार यांनी वेळ देऊन दोन्ही बाजू ऐकून योग्य निर्णय दिला़