सांगलीत फ्लॅट फोडून पाच लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:51 AM2020-12-17T04:51:47+5:302020-12-17T04:51:47+5:30
१६१२२०२०२ एसएएन ०३ : सांगलीच्या गावभागातील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ...
१६१२२०२०२ एसएएन ०३ : सांगलीच्या गावभागातील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहर परिसरात चोरीचे सत्र सुरूच असून, बुधवारी दुपारी गावभाग येथील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी रोख तीस हजार रुपयांसह अकरा तोळे सोने असा पाच लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी शीतल जयकुमार पाटील (वय ३३, रा. पर्णिका रेसिडेन्सी, गावभाग, सांगली) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गावभागातील पाटील गल्ली येथील पर्णिका रेसिडेन्सीमध्ये राहण्यास असलेले पाटील हे बँकेत नोकरीस आहेत. बुधवारी पाटील यांच्या पत्नी कामानिमित्त परगावी गेल्या होत्या. तर स्वत: पाटील बाहेर गेले होते. फ्लॅटवर कोणी नसल्याचे संधी साधून चोरट्यांनी बंद फ्लॅटचा दरवाजा फोडून आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये कपाटातील अकरा तोळे सोने आणि तीस हजारांची रोकड चोरट्यांच्या हाती लागली. त्यांनी इतरही काही मिळते का हे पाहण्यासाठी खोलीतील साहित्य विस्कटले होते. दीडच्या सुमारास पाटील यांना चोरीचा प्रकार समजल्यानंतर त्यांनी शहर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व पुढील तपास सुरू केला आहे. भरवस्तीतील आणि दिवसा फ्लॅट फोडून चोरट्यांनी पुन्हा एकदा पाेलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे.
चौकट
पोलिसांनी पंचनामा करून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चोरीच्या अधिक तपासासाठी तातडीने श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. भरवस्तीत दुपारी चोरीचा प्रकार घडल्याने पाेलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे.