थकीत कर्जामुळे ओढून आणलेली मोटार एकाकडून लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:29 AM2021-09-26T04:29:43+5:302021-09-26T04:29:43+5:30
सांगली : थकीत कर्जामुळे ओढून आणलेली मोटार एकाने लंपास केली. याप्रकरणी शिवराज वसंत गायकवाड (रा. वसंतनगर, सांगली) यांनी सचिन ...
सांगली : थकीत कर्जामुळे ओढून आणलेली मोटार एकाने लंपास केली. याप्रकरणी शिवराज वसंत गायकवाड (रा. वसंतनगर, सांगली) यांनी सचिन जाधव (रा. अचकदानी, ता. सांगोला) व त्यांचा अनोळखी मित्र अशा दोघांविरोधात संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चोलामंडलम फायनान्स कंपनीच्या थकीत कर्ज असलेले वाहन ठेवण्याची जबाबदारी गायकवाड यांच्याकडे आहे. यासाठी त्यांचे लक्ष्मीनगर परिसरात यार्ड आहे. याठिकाणी संशयित जाधव याची मोटार आणून लावण्यात आली होती. शुक्रवार, दि. २४ रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास जाधव लक्ष्मीनगर येथील श्रीप्रसाद पार्किंग यार्डमध्ये आला व त्याने तेथील कामगार शंकर पाटील यांच्याकडून गाडीमध्ये काहीतरी राहिले आहे म्हणून चावी घेतली व तो तेथून गाडी घेऊन निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.