ओळखीचा गैरफायदा घेत आठ लाखांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:14 AM2021-02-20T05:14:48+5:302021-02-20T05:14:48+5:30
सांगली : विश्वासाने ठेवण्यास दिलेले आठ लाख १९ हजार रुपये किमतीचे दागिने परत न करता महिलेची फसवणूक करण्यात आल्याचा ...
सांगली : विश्वासाने ठेवण्यास दिलेले आठ लाख १९ हजार रुपये किमतीचे दागिने परत न करता महिलेची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार सांगलीत घडला. याप्रकरणी वंदना बापू माने (रा. मौर्य अपार्टमेंट, पंचमुखी मारुती रोड, सांगली) यांनी समाधान कांबळे (रा. पंचशिलनगर, जुना बुधगाव रोड, सांगली) याच्याविरोधात विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी माने एकट्याच सांगलीत राहण्यास आहेत, तर त्यांचे पती व मुले व्यवसायानिमित्त मुंबई येथे असतात. त्यांच्या नणंदेच्या मुलाचा मित्र असलेला समाधान त्यांच्याकडे येत असल्याने त्यांची ओळख होती. कर्ज फेडण्यासाठी माने यांच्याजवळ असलेले सोने घेऊन जाण्यासाठी त्यांचे पती सांगलीत येणार होते. त्यामुळे १० नोव्हेंबर राेजी फिर्यादी माने यांनी समाधानला ते सोने घेऊन जाण्यास येणार असल्याचे सांगितले. यावेळी संशयिताने दागिने माझ्याकडे द्या, मी सुरक्षित ठेवतो म्हणून घेतले होते. मात्र, नंतर त्याने त्याच्या दुचाकीच्या डिकीत सोन्याची ठेवलेली पिशवी चोरीस गेल्याचे सांगून पोलिसात तक्रार देण्यासाठी जात असल्याचे माने यांना सांगितले होते.
सोन्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली, तर तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. याबाबत पतीसोबत त्याच्या घरी जाऊन चौकशी केली असता, त्याने सात तोळे दागिने परत दिले; मात्र, इतर दागिने त्याने परत दिले नाहीत. भाच्याचा मित्र असल्याने फिर्यादींनीही उर्वरित सोने तो परत देईल म्हणून तक्रार दाखल केली नव्हती. वारंवार मागूनही सोने परत देत नसल्याने अखेर संशयित समाधान याच्याविरोधात विश्रामबाग पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.