खड्ड्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सांगली-इस्लामपूर मार्गावर लागणार दिवे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 11:06 PM2017-10-11T23:06:02+5:302017-10-11T23:06:02+5:30

Lamps to be set up on the Sangli-Islampur road to highlight the potholes! | खड्ड्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सांगली-इस्लामपूर मार्गावर लागणार दिवे!

खड्ड्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सांगली-इस्लामपूर मार्गावर लागणार दिवे!

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली - इस्लामपूर या रस्त्यावरील असंख्य खड्ड्यांवर प्रकाश टाकण्यासाठी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी १७ आॅक्टोबर रोजी या संपूर्ण मार्गावर सर्व गावांच्या सहभागाने दिवे लावण्यात येणार आहेत. सर्वपक्षीय लोकांच्या सहभागातून खड्डेमुक्तीसाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती रस्ता बचाव कृती समितीचे पदाधिकारी पृथ्वीराज पवार, अ‍ॅड. श्रीकांत जाधव, सतीश साखळकर, अ‍ॅड. अमित शिंदे, राहुल थोटे यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, सांगली-इस्लामपूर रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे. या रस्त्यावर सतत अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर कित्येकजण जखमी झाले आहेत. नागरिकांनी वारंवार तक्रारी करून तसेच आंदोलने करुनही सरकार याची दखल घेत नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. या रस्त्याचे काम म्हणजे निकृष्टपणाचा आदर्श नमुनाच आहे. जनतेच्या सहनशीतलतेचा अंत झाल्याने काही सामाजिक संघटना न्यायालयात गेल्या आहेत. तसेच सर्व सामाजिक संघटना एकत्र येऊन यापुढे जोरदार आंदोलन केले जाणार आहे.
सांगली ते पेठपर्यंतच्या सर्व गावांतील सर्व सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले आहेत. दिवाळीदिवशी आंदोलनाची अनोख्या पध्दतीने सुरुवात केली जाणार आहे. रास्ता रोको, निदर्शने, धरणे याचा परिणाम होत नसल्याने, गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग आणण्यासाठी या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये दिवे लावले जाणार आहेत. सर्व गावे यात सहभागी होणार आहेत. या दिवशी सायंकाळी सात वाजल्यानंतर सर्वजण रस्त्यावर येऊन दिवे लावून शासनाचा निषेध करणार आहेत.
आंदोलनाचे संयोजन महेश खराडे, कुमार पाटील, प्रदीप कांबळे, आनंद देसाई, आयुब पटेल, सचिन चोपडे, अमर पडळकर, मयूर घोडके, युसूफ मिस्त्री, विजय पवार, विजय डांगे, संजय कोले, महावीर चव्हाण, अश्रफ वांकर, संजय बेले, सुनील फराटे, अ‍ॅड. विजय खरात यांच्यासह कार्यकर्ते करीत आहेत.

Web Title: Lamps to be set up on the Sangli-Islampur road to highlight the potholes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.