हरित राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन आता गतीने होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 01:03 PM2022-09-20T13:03:26+5:302022-09-20T13:31:33+5:30
पुणे आणि बंगळुरू शहरांना जोडण्यासाठी सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या दुष्काळी टापूतून जाणाऱ्या ६९९ किलोमीटर लांबीच्या नवीन हरित राष्ट्रीय महामार्गाची घोषणा गडकरी यांनी मार्चमध्ये केली होती.
तासगाव : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-बंगळुरू हरित महामार्ग (ग्रीन फिल्ड हायवे)बाबत केलेल्या घोषणेनंतरच लगेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रक्रियेस सुरुवात केली आहे. त्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी भूसंपादनाबाबतचे आदेश दिले असून, त्यासाठी खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ व मिरज तालुक्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
पुणे आणि बंगळुरू शहरांना जोडण्यासाठी सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या दुष्काळी टापूतून जाणाऱ्या ६९९ किलोमीटर लांबीच्या नवीन हरित राष्ट्रीय महामार्गाची घोषणा गडकरी यांनी मार्चमध्ये केली होती. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या बंगळुरू आणि हैदराबाद कार्यालयाकडून महामार्गाच्या सर्वेक्षणाचे काम झाले. त्यानंतर, प्रस्तावित मार्गासाठी मोजणीचे काम पूर्ण करण्यात आले. आता प्रत्यक्ष भूमी संपादनाची प्रक्रिया सुरू होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी खानापूर तालुक्यासाठी विटा येथील उपविभागीय अधिकारी तर तासगाव, कवठेमहांकाळ व मिरजेसाठी मिरजेचे उपविभागीय अधिकारी यांना नियुक्त केले आहे.
या गावांत होणार भूसंपादन
तालुका - गावे :खानापूर - माहुली, वलखड, वेजेगाव, भेंडवडे, साळशिंगे, जोंधळखिंडी, माधळमुठी, वासुंबे, रेणावी, रेवणगाव, घोटी खुर्द, घोटी बुद्रुक, तासगाव - कचरेवाडी, नरसेवाडी, किंदरवाडी, विजयनगर, पेड, मोराळे, मांजर्डे, गौरगाव, हातनोली, बस्तवडे, सावळज, वज्रचौंडे, मणेराजुरी, गव्हाण, कवठेमहांकाळ - बोरगाव, मळणगाव, हारोली, देशिंग, बनेवाडी, शिंदेवाडी खुर्द, कुकटोळी, रामपूरवाडी, कोंगनोळी, मिरज - सलगरे, बेळंकी, संतोषवाडी.
कोणत्या तालुक्यात किती अंतर
- खानापूर १२६.५७० ते १५०.१०० किमी
- तासगाव १५०.१०० ते १७६.७४० किमी
- कवठेमहांकाळ १७६.७४० ते १९६.०३५ किमी
- मिरज १९६.०३५ ते २०१.२०० किमी
३१ हजार कोटी खर्च अपेक्षित
या महामार्गासाठी ३१ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. महामार्ग तयार झाल्यानंतर बंगळुरू आणि पुणे या शहरातील अंतर ७५ किलोमीटरने कमी होणार आहे. तो सहापदरी असेल.