बारामती-संकेश्वर मार्गासाठी मिरज, तासगाव तालुक्यांत होणार भूसंपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 05:46 PM2023-02-08T17:46:54+5:302023-02-08T17:47:26+5:30
केंद्र व राज्य शासनाने भरपाईची व्याप्तीही कमी केल्याने शेतकऱ्यांना मुबलक पैसे मिळणार नाहीत
सांगली : जिल्ह्यातून जाणाऱ्या नव्या बारामती-संकेश्वर महामार्गासाठी मिरज व तासगाव तालुक्यांत भूसंपादन केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी भूमिसंपादन अधिकारी म्हणून प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. दोन्ही तालुक्यांत मिळून २० गावांत भूमिसंपादन केले जाईल.
याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी नुकतेच काढले आहेत. मिरज व तासगावचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. भारतमाता टप्पा २ परियोजनेतून या राष्ट्रीय महामार्गाचे (क्रमांक १६०/७१) काम केले जाणार आहे. बारामतीमधून सुरू होऊन संकेश्वर येथे संपेल. त्यातील फलटण ते म्हैसाळ एक्सप्रेस वेमधील काही भाग सांगली जिल्ह्यातून जात आहे. त्यासाठीच्या भूमिसंपादनाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.
दरम्यान, भूमिसंपादन होणाऱ्या काही गावांतील बरीच जमीन सिंचनाखालील असल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. कवलापूर, मालगाव, टाकळी, बेडग, विजयनगर, म्हैसाळ, विसापूर, तासगाव, कवठेएकंद येथील पिकाऊ जमीन महामार्गासाठी जाण्याची शक्यता आहे. केंद्र व राज्य शासनाने भरपाईची व्याप्तीही कमी केल्याने शेतकऱ्यांना मुबलक पैसे मिळणार नाहीत. रत्नागिरी ते नागपूर महामार्गासाठी रेडीरेकनरच्या पाचपटींपर्यंत पैसे मिळाले होते, तितके या महामार्गासाठी मिळण्याची शक्यता नाही.
या गावांत भूसंपादन
मिरज तालुका : कवलापूर, काकडवाडी, रसुलवाडी, कानडवाडी, तानंग, मालगाव, टाकळी, बोलवाड, वड्डी, बेडग, विजयनगर, म्हैसाळ.
तासगाव तालुका : लिंब, शिरगाव, विसापूर, तासगाव, वासुंबे, चिंचणी, कवठेएकंद, नागावकवठे