धनगरवाड्यामध्ये जमिनीवरून वन विभाग, शेतकऱ्यांमध्ये संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:28 AM2021-05-20T04:28:14+5:302021-05-20T04:28:14+5:30
वारणावती : दीडशे वर्षांपेक्षा जास्त म्हणजे देश स्वतंत्र व्हायच्या अगोदरपासून पणजोबा, खापरपणजोबा जी शेती कसून खात होते, तेवढीच ...
वारणावती : दीडशे वर्षांपेक्षा जास्त म्हणजे देश स्वतंत्र व्हायच्या अगोदरपासून पणजोबा, खापरपणजोबा जी शेती कसून खात होते, तेवढीच शेती आजही आम्ही कसून खात आहोत. ज्या शेतात वरी, नाचणी, कारेळा, भात यांची पेरणी केल्यानंतर वनविभाग तुमच्या नावावर जमीनच नसल्यामुळे पेरणी करू नका म्हणत आहे. यावरून शिराळा तालुक्यातील धनगरवाडा, विनोबाग्राम येथील शेतकरी आणि वनविभागाकडून सध्या वाद सुरू झाला आहे.
धनगरवाडा गावांमध्ये ५६ घरे आणि ४०० लोकसंख्या; तर विनोबा ग्राम १६ घरांचा आणि शंभर लोकांच्या वस्तीचा. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी म्हणजे पारतंत्र्यात असताना नेमिनाथ कत्ते गुरुजी यांनी बसविलेल्या या वस्त्या आहेत. या दोन्ही वस्त्या बफर झोनमध्ये येत असून मणदूर ग्रामपंचायतीला जोडल्या आहेत. विशेष म्हणजे ४२ वर्षांपासून या गावात मद्यप्राशन करणे आणि विक्रीस बंदी आहे. येथील लोक पूर्वी पासून तीनशे ते साडेतीनशे एकर शेतात नाचणा, वरी, भात, कारेळा यांसारखी पिके दरवर्षी घेत आहेत. यातून पोट भरत नसल्याने जांभळे, करवंदे, आळू यांसारखी फळे येथील महिला, पुरुष अनेक वर्षांपासून विकत आहेत. येथील शेतकरी दीडशे वर्षांपेक्षा जास्त दिवस झाले शेती करीत आहेत. ही वस्तुस्थिती असताना सध्या वनविभागाचे अधिकारी तेथील शेतकऱ्यांना ही तुमची जमीन नाही तर ती वनविभागाची आहे. यामुळे तुम्ही येथे शेती करू नये, अशी सूचना देत आहेत.
याबत महसूल विभागाने १९६७ मध्ये दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, १६६ एकर क्षेत्रांवर वनक्षेत्र राहणार नाही, म्हणजे ते क्षेत्र धनगरवाडा, विनोबाग्राम यांचे आहे. वनविभाग सांगते तुम्हाला ३४ एकरांपेक्षा (गट नंबर २२२ मधील) जास्त जमीन मिळणार नाही. त्यामुळे गट नंबर २२१ अ/ब/क मधील जमीन नेमकी कोणाची, हा वाद स्थानिक शेतकरी आणि वनविभाग यांच्यात गेल्या ८० वर्षांपेक्षा जास्त दिवस सुरू आहे. गावात घरे आहेत, लोक आहेत, जनावरे आहेत, शेती करीत आहेत, लोकांचे मतदान आहे. विविध प्रकारचे महसूल कर भरले जात आहेत. असे असताना वापरात असलेली जमीन तुमची नाही, असे वनविभाग सांगत असल्याने येथील शेतकऱ्यांच्या पायांखालची जमीन सरकली आहे. सध्या येथील शेतकऱ्यांना जमीन मिळवून देण्यासाठी मणदूर सरपंच वसंत पाटील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत.
चौकट
गेल्या दीडशे वर्षांपासून धनगरवाडा, विनोबाग्राम येथील आम्ही पिढीजात शेतकरी तीनशे ते साडेतीनशे एकर जमीन कसत आहे. त्यात पिके घेत आहे. त्यामुळे सातबाराला नावे आहेत की नाहीत हे आम्हांला माहीत नसून वनविभागाने त्यांच्या जमिनीची मोजणी करून हद्द ठरवावी आणि आमच्या जमिनीत येऊ नये, अशी भूमिका धनगरवाडा येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे.