इस्लामपूर परिसरात भूखंड माफियांचा झाला शिरकाव...
By admin | Published: March 2, 2016 11:26 PM2016-03-02T23:26:18+5:302016-03-03T00:04:03+5:30
जमिनींचे दर भडकले : पेठ, कापूसखेड, कामेरी, साखराळेतील चित्र, खरेदी व्यवहारात गावगुंडानीही सुरू केली दलाली
अशोक पाटील -- इस्लामपूर इस्लामपूर शहराचा चारही दिशेने विस्तार वाढला असून, मध्यवर्ती ठिकाणच्या जागेचे मोल करणे अशक्य झाले आहे. शहरालगतच्या पेठ, कापूसखेड, कामेरी, साखराळे हद्दीतील जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या परिसरातही भूखंड माफियांचा शिरकाव झाला आहे. जागांचे खरेदी व्यवहार होण्यासाठी काही गावगुंडांनी दलाली सुरू केली आहे. यातून गुन्हेगारी बोकाळत चालली आहे.
इस्लामपूर शहरात औद्योगिक, शिक्षण, व्यापार या क्षेत्रांचा विस्तार होत आहे. मुलांच्या शिक्षणासाठी ग्रामीण भागातील सधन शेतकरी शहरात वास्तव्यास येत आहेत. त्यातून शहरातील मोक्याच्या जागांचे भाव भडकले आहेत. व्यापारी संकुलांची संख्या वाढू लागली आहे. शंभर चौरस फूट गाळ्याचा दर २० ते २५ लाखांच्या घरात गेला आहे. बाजारपेठ, बसस्थानक, शिक्षण संस्था या परिसरात मोकळ्या जागा मिळत नाहीत. सदनिकांचे दर ३५०० ते ४००० रुपये चौरस फूट आहेत. उपनगरातील सदनिकांचे दर २५०० रुपये चौरस फूट आहेत. त्या खरेदी करणे सर्वसामान्यांना परवडत नसल्याने त्यांनी शहरापासून तीन ते पाच किलोमीटरवरील कापूसखेड, साखराळे, कामेरी, पेठ या ग्रामपंचायत हद्दीत जागा घेणे पसंद केले आहे. त्यामुळे शहरालगतच्या ग्रामीण भागातील जागांचे भावही दिवसेंदिवस वाढू लागले आहेत.
इस्लामपूर-सांगली आणि वाळवा रस्त्यावरील जमीन क्षारपड आहे. त्यामुळे तेथे बांधकाम करण्यासाठी ३० ते ४० फूट पाया काढावा लागत आहे. परिणामी त्या बाजूला जागा घेणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे.
राजारामबापू साखर कारखाना परिसर व साखराळे हद्दीतील माळरानाचा लाखोंचा भाव मिळत आहे. तेथे १० ते १५ लाख रुपये गुंठा असा दर सुरू आहे. अशीच परिस्थिती कापूसखेड, कामेरी, पेठ या गावांच्या हद्दीतील जागांची आहे.
या जागा खरेदी करण्यासाठी इस्लामपूर शहरातील भूखंड माफिया सरसावले आहेत. मुंबई, पुणे शहरात अवैध व्यवसायांतून मिळवलेला पैसा या भूखंड माफियांमार्फत मुरवला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. या जमीन वादातूनच अनेकवेळा खून, मारामाऱ्या असे प्रकार घडले आहेत. नुकत्याच झालेल्या पेठ येथील सुकुमार पवार यांच्या मृत्यूला जमीन खरेदी-विक्री व्यवहारच कारणीभूत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.