सरकारच्या फॅसिझमविरोधात रस्त्यावर उतरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:22 AM2017-09-07T00:22:24+5:302017-09-07T00:22:24+5:30

Land on the road against the government's fascism | सरकारच्या फॅसिझमविरोधात रस्त्यावर उतरा

सरकारच्या फॅसिझमविरोधात रस्त्यावर उतरा

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : देशात सत्तेवर असलेल्या प्रतिगाम्यांमध्ये मतांच्या आधारावर सरकार चालविण्याचे धाडस नाही. सर्व आघाड्यांवर आलेले अपयश झाकण्यासाठी विचारवंतांच्या हत्यांचे सत्र सुरु आहे. बेंगलोरमधील पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या ही ‘सरकारकडे कानाडोळा करा’ असे सांगणारी आहे. या फॅसिझमविरोधात जनतेने रस्त्यावर उतरायला हवे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गणेश देवी यांनी केले.
येथील तहसील कचेरीजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बुधवारी सायंकाळी, गौरी लंकेश या महिला पत्रकाराच्या हत्येचा जाहीर निषेध अंधश्रध्दा निर्मूलन समितीसह इतर सर्व परिवर्तनवादी संघटनांनी केला. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘विवेकाचा आवाज बुलंद करुया’ अशा घोषणा दिल्या.
डॉ. देवी म्हणाले की, गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर कर्नाटकासह देशभरातून संवेदनशील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. ज्वालामुखीप्रमाणे हा असंतोष खदखदत आहे. विवेकाच्या लढाईतून हरवत चाललेले स्वातंत्र्य पुन्हा मिळविण्यासाठी देशभरात प्रचंड मोठी मानवी साखळी निर्माण करणे गरजेचे आहे.
प्रा. विजय जोखे म्हणाले की, ज्या लोकांना स्वातंत्र्य, राज्यघटना आणि तिरंगा ध्वज नको होता, ज्यांना धर्माधीष्ठीत राज्य हवे होते, अशा शक्ती आज सत्तेवर आल्या आहेत. सध्या विचारवंतांच्या होत असलेल्या हत्यांचे मूळ हे या विचारधारेत दडले आहे. त्याचा सर्वांनी निषेध करायला हवा.
प्रा. संजय थोरात म्हणाले, पत्रकार गौरी लंकेश बातमीतील वस्तुनिष्ठतेचा बळी ठरल्या आहेत. तक्षशीला ज्ञानकेंद्राचे अध्यक्ष प्रकाश कांबळे म्हणाले, या हत्यांमधून समाजाला भयभीत करुन हुकूमशाही लादण्याचा डाव उधळून टाकला पाहिजे.
‘अंनिस’चे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे म्हणाले की, चार वर्षात चार विचारवंतांच्या झालेल्या हत्या वेदनादायी आहेत. माणसाला मारुन विचार संपत नाहीत. पुरोगामी कार्यकर्त्यांनी समाजव्यवस्था बदलण्याचा आग्रह धरताना, अशा घटनांचा सतत मौखिक निषेध नोंदवला पाहिजे. समाजमाध्यमांचा वापर करुन विवेकी आवाजाचा दबाव वाढविणे गरजेचे आहे.
माजी प्राचार्य विश्वास सायनाकर म्हणाले की, व्यवस्थेचा खोटेपणा उघडा पडायला लागला की, ती व्यवस्था पिसाट बनते. आताच्या प्रतिगाम्यांची हीच अवस्था झाली आहे. हिंदुत्ववादाच्या वर्तनात वेडेपणा आला आहे. या वेडेपणाविरुध्द डॉ. दाभोलकर, पानसरे, डॉ. कलबुर्गी आणि आता पत्रकार गौरी लंकेश हे उभे राहिल्याने त्यांच्या हत्या झाल्या. पुरोगामी विचारांनी धर्मवादी परंपरेला नेहमी धक्के दिले आहेत. गौरीवरील हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला आहे. या संघर्षामध्ये सर्वांनी एकजूट दाखवायला हवी.
प्रा. सुभाष ढगे, रितेश अदलिंगे यांनीही या हत्यांचा निषेध केला. प्रा. सतीश चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एकनाथ पाटील यांनी आभार मानले. यावेळी कॉ. धनाजी गुरव, प्रा. शामराव पाटील, डॉ. नीलम शहा, रोझा किणीकर, डॉ. मंजुश्री पाटील, प्रा. एल. डी. पाटील, प्रा. विष्णू होनमोरे, एम. के. पाटील उपस्थित होते.
तपासासाठी २८ नोव्हेंबरची मुदत; अन्यथा उपोषण
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमधून फॅसिझमची भेडसावणारी सावली अधिक गडद होत चालली आहे. गौरीवरील हल्ला हा पत्रकारितेच्या लोकशाहीतील चौथ्या खांबाच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे. पूर्वनियोजित कट रचून ही भ्याड हत्या घडवून आणली गेली आहे. अशा खुनी मानसिकतेवर बंदी घालायला हवी. डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येसंदर्भातील तपास पूर्ण करण्यासाठी २८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत योग्य खुलासा न झाल्यास बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे डॉ. गणेश देवी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
श्रमिक पत्रकार संघातर्फे निषेध
बेंगलोर येथील लंकेश पत्रिकेच्या संपादिका गौरी लंकेश यांच्यावर भ्याड हल्ला करुन त्यांची हत्या करणाºया संशयितांना कर्नाटक शासनाने तातडीने अटक करावी, अशी मागणी करीत वाळवा तालुका श्रमिक पत्रकार संघटनेच्या बैठकीत त्यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला.

Web Title: Land on the road against the government's fascism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.