पाच लाख खातेदारांना जमिनीचे आरोग्यपत्र
By admin | Published: June 24, 2015 12:21 AM2015-06-24T00:21:53+5:302015-06-24T00:41:34+5:30
कृषी विभाग : क्षारपडमुक्त जमिनीस प्राधान्य
सांगली : केंद्र शासनाच्या आदेशानुसार जिल्हा मृद् सर्वेक्षण व चाचणी विभागाच्यावतीने जिल्ह्यातील ५ लाख ३५ हजार खातेदारांना त्यांच्या जमिनीचे आरोग्यपत्र देण्यात येणार आहे. बागायत आणि जिरायत क्षेत्रातील मातीचे नमुने जीपीएस उपकरणाच्या साहाय्याने घेतले जात आहेत. यामुळे जमिनी क्षारपड होण्यापासून वाचविता येणार असून, एकरी उत्पादनही वाढण्यास मदत होणार आहे. पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी मृद् आरोग्य अभियान हा एक आहे. जिल्ह्यातील एक लाख एकराहून अधिक जमीन क्षारपड झाली आहे. एकरी उत्पादनही ५० टक्क्याने घटले आहे. जमिनीचा पोत न पाहता शेतकरी जादा उत्पादन मिळविण्यासाठी अति पाण्याचा आणि रासायनिक खतांचा वापर करीत आहेत. यामुळे शेतीचे उत्पादन वाढण्याऐवजी जमिनी क्षारपड होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने जमिनीचे आरोग्य तपासण्यासाठी मृद् आरोग्य अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा मृद् सर्वेक्षण व चाचणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी २०१५ ते १८ असा तीन वर्षाचा जिल्ह्याचा आराखडा तयार केला असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे यांनी सांगितले.जिल्हा मृद् सर्वेक्षण व मृद् चाचणी अधिकारी प्रकाश कुंभार म्हणाले की, जिल्ह्यातील ५ लाख ३५ हजार खातेदारांच्या जमिनीतील मातीचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तीन वर्षात एकूण १४ लाख ४६ माती नमुने घेतले जाणार आहेत. त्यापैकी २०१५-१६ वर्षामध्ये ३७ हजार ८२० नमुने तपासून शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्यपत्र देण्यात येणार आहे.
या वर्षात खरीप हंगामामध्ये ३९ गावांमधील १७ हजार ६७७ आणि रब्बी हंगामात ६० गावांमधील ३७ हजार ८२० मातीचे नमुने तपासणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील शासकीय प्रयोगशाळा, तसेच आठ खासगी प्रयोगशाळांची मदत घेण्यात येणार आहे. यामध्ये एक फिरती माती चाचणी प्रयोगशाळा असणार आहे.
शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन तेथील नमुने फिरती प्रयोगशाळा घेणार आहे. लगेच शेतकऱ्यांना जमिनीमध्ये कोणते घटक कमी आणि कोणते घटक जास्त आहेत, याची कल्पना दिली जाणार आहे. यामुळे शेतीचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)