जिल्हाधिकारी यांनी जमीन हस्तांतरित करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:28 AM2021-04-08T04:28:20+5:302021-04-08T04:28:20+5:30
आष्टा : आष्टा शहरातील आष्टा-तासगाव मार्गावरील गट क्रमांक ३४/२२९ मधील मुख्याधिकारी आष्टा नगर परिषद यांच्या नावावर असलेली २.४६ हेक्टर ...
आष्टा : आष्टा शहरातील आष्टा-तासगाव मार्गावरील गट क्रमांक ३४/२२९ मधील मुख्याधिकारी आष्टा नगर परिषद यांच्या नावावर असलेली २.४६ हेक्टर आर जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी जुन्या अटी शर्तीचा भंग झाल्याप्रकरणी महाराष्ट्र शासनाच्या नावावर केली आहे. या ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी ती पुन्हा मुख्याधिकारी यांच्या नावावर करण्यात यावी, असा ठराव आष्टा नगरपरिषदेच्या ऑनलाईन सभेत एकमताने घेण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा स्नेहा माळी होत्या. मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, उपनगराध्यक्षा प्रतिभा पेटारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. स्नेहा माळी म्हणाल्या, आष्टा शहरातील ही जमीन २००८ मध्ये आष्टा नगरपालिकेकडे घरकुल बांधण्यासाठी वर्ग करण्यात आली होती. या क्षेत्रावरील मुख्याधिकारी आष्टा नगरपरिषद यांचे नाव कमी करून महाराष्ट्र शासनाचे नाव लावण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशातील अटी शर्तीचा भंग झाल्याने त्यांनी जमीन शासनाकडे वर्ग करून घेतली आहे. संबंधित जमीन नगरपालिकेकडे पुन्हा वर्ग करण्यात यावी.
विरोधी पक्ष नेते वीर कुदळे म्हणाले, आष्टा पालिकेला जागा मिळावी ही अपेक्षा आहे. मात्र, सध्या ती धुसर आहे. मागील दोन वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जागा मागणीबाबत पत्रव्यवहार होत आहे. याबाबत पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.
जागा मागण्याऐवजी भारत गॅस कंपनीला ना हरकत दाखला देण्यात येऊ नये अशी मागणी कुदळे यांनी केली.
यावेळी झुंजारराव पाटील, धैर्यशील शिंदे, पुष्पलता माळी, सारिका मदने, विजय मोरे, मंगल सिद्ध, पी. एल. घस्ते, विकास बोरकर, मनीषा जाधव, जगन्नाथ बसुगडे, रुक्मिणी अवघडे, वर्षा अवघडे, सारिका खोत, विमल थोटे, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.